औरंगाबाद: महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेस, रिपब्लिकन सेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली. पैठण येथे संतपीठाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात मंत्री पाटील यांनी हे उद्गार काढले. आणि त्यावर औरंगाबादेत लगेच पडसाद उमटले.
सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते जमले. यात महिलांचाही सहभाग होता. औरंगपुरा येथील स.भु महाविद्यालयाजवळ अचानक एकत्र येऊन हे कार्यकर्ते ‘ महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, माफी मांगो, चंद्रकांत पाटील माफी मागो’अशा घोषणा देऊ लागले. तिकडे आत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु होता. महापुरुषांबद्दल अपशब्द का वापरले असा जाब कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याना विचारायचा होता. दरम्यान, शेख यांच्यासमवेत डॉ. पवन डोंगरे, दीपाली मिसाळ, डॉ. अरुण शिरसाट, महेंद्र रमंडवाल, अनिस पटेल, सागर नागरे, अनीता भंडारे,दीक्षा पवार, मंजू लोखंडे, रवी लोखंडे, लियाकत पठाण, रुबीना शेख, स्वाती सरोदे, आमेर अब्दुल सलीम, सचिन लोखंडे, कैसरबाबा आदींना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. व नंतर सोडून दिले.
महाविद्यालय परिसरात निषेध पत्रके उधळलीदरम्यान, स.भु महाविद्यालयाजवळ मंत्री पाटील यांच्या निषेधाचे पत्रक उधळून सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, राहुल वडमारे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप संबंधितांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचे हे षड्यंत्र आहे. या सर्वांची नार्कोटेस्ट करून तुरुंगात टाकावे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.