औरंगाबाद : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या ३० वर्षांतील नाकर्तेपणाचा पाढा वाचत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेत प्रचाराचा नारळ फोडला. तर बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपतर्फे मेनॉर हॉटेलच्या लॉनयर शनिवारी सायंकाळी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेची मागील ३० वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. या काळात शिवसनेने केलेले एक काम दाखवा. शहरात कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. जनतेला जे हवे ते शिवसेनेने उभारले नाही. त्यामुळे आम्हाला महापालिकेतील एकहाती सत्ता द्या, आम्ही मोफत शौचालय व्यवस्था, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांसाठी मोफत बससेवा, हॉस्पिटल सेवा देऊ, अशा घोषणा पाटील यांनी करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली आहे. आता घटनेत नसताना मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेत आहेत. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. अशी ही शिवसेना शहरातील जनतेला सुरक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना हद्दपार करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. तर याच वेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सुद्धा ठाकरे सरकारवर टीका केली. सरकराने 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि केवळ 15 जणांचीच यादी यादी जाहीर केली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.