औरंगाबाद : फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते चुकविण्यासाठी आणि पोलिसांच्या दंडाची रक्कमही भरावी लागू नये, याकरिता चक्क दुचाकीवर दुसऱ्या वाहनाचा क्रमांक टाकणारा बुधवारी नाकाबंदीदरम्यान आरेफ कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पकडला गेला. अहेमद खान आरिफ खान (रा. नफिस अपार्टमेंट,भडकलगेट ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक ज्योती गात, वाहतूक शाखेच्या हवालदार सुनीता वाल्डे आणि अन्य कर्मचारी बुधवारी दुपारी टाऊन हॉल पुलाजवळ आरेफ कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करीत होते. यावेळी एका दुचाकीस्वाराला त्यांनी अडवले तेव्हा त्याने ऑनलाइन पावती द्या, मला घाई आहे, असे तो म्हणाला. पोलिसांनी ई चलन मशीनमध्ये दुचाकीचा क्रमांक टाकला असता दुचाकी मालकाचे नाव सुधीर गंगाधर साकोळकर असे आले. याविषयी पोलिसांनी आरोपीकडे विचारपूस केल्यावर तो आमचा शेजारी आहे आणि त्याचीच दुचाकी असल्याचे तो म्हणाला.
पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावल्याने त्यांनी साकोळकरच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याची दुचाकी त्याच्या घराजवळ उभी असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी अहेमदला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. फायनान्स कंपनीचे दुचाकीवर कर्ज आहे. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे फायनान्सवाले दुचाकी ओढून नेण्याची शक्यता आहे. त्यांची नजर चुकविण्यासाठी आपण दुचाकीवर दुसऱ्याच्या दुचाकीचा क्रमांक टाकल्याची कबुली केली. याविषयी हवालदार वाल्डे यांनी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविला.