औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात वर्षानुवर्षे एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे टेबल बदला. तसेच शासन निर्णयानुसार एका अधिकाऱ्याकडे एक जबाबदारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठेवू नये, असा ठराव बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
पैठण येथे संतपीठ सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाने २५ लाखांची तरतूद केली होती. ती वाढवून ५० लाख करून त्याला सिनेटची मान्यता घ्यावी. तसेच शैक्षणिक भार विद्यापीठ उचलेल, मात्र प्रशासकीय वेतन व वेतनेतर आर्थिकदायित्व शासनाने घ्यावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. घनसावंगी येथील माॅडेल काॅलेजमध्ये मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ मार्चला होणाऱ्या सिनेटमध्ये कोणते विषय ठेवले जाणार यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. तर नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव व बिंदूसंदर्भात गुरुवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे.
बैठकीला कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह प्रा. फुलचंद सलामपुरे, प्रा. राजेश करपे, प्रा. विलास खंदारे, प्रा. प्रतिभा अहिरे, प्रा. संजय निंबाळकर, प्रा. राहुल म्हस्के, प्रा.जयसिंगराव देशमुख, प्रा. हरिदास इधाटे, प्रा. सुनील निकम, प्रा.चेतना सोनकांबळे, प्रा. भालचंद्र वायकर, प्रा. सचिन देशमुख आदी उपस्थित होते.