औरंगाबाद, दि. 27 : मोठेपणा मागून मिळत नसतो ते आपल्या वागणूकीतून (कृर्तीतून ) मिळत असतो. कसे वागावे याची कला क्षमापर्व शिकवत असते. ‘ क्षमा मागणे किंवा क्षमा करणे’ हे वीर पुरुषाचे लक्षण आहे. त्यासाठी स्वता:च्या स्वभावामध्ये बदल करा, परिवर्तन घडून आणा , असा संदेश गौरवमुनीजी म.सा. यांनी दिला. तर ‘क्षमायाचना ओठातूनच नव्हे तर हृदयातून करा,’ असे आवाहन मनमितसागरजी म.सा. यांनी केले.
प्रसंग होता, श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ व सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित सामूहिक क्षमायाचनेच्या कार्यक्रमाचा. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील वोखार्ड कंपनी जवळील प्रेसिडेंट लॉन्स येथे आयोजित सोहळ्यात उपस्थित श्रावक-श्राविकांना जैन साधु-संतांनी मार्गदर्शन केले. गौरवमुनीजी म.सा म्हटले की, सर्वांना आपले वस्त्र मॅचिंग पाहिजे असतात पण एकामेकांची स्वभावाचे मॅचिंग झाले पाहिजे. तेव्हाच कोणाच्या मनामध्ये कटुतेची भिंत उभी रहाणार नाही. उड्डाणपुलामुळे दोन रस्ते जोडल्या जातात तसाच वैचारिक उड्डाणपुल एकामेकांमध्ये तयार करा.
क्षमापर्वही नुसती ‘प्रथा’ मानू नका. तिचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करा. शत्रूला मारण्यासाठी शस्त्र पाहिजे असते पण त्याच शत्रूला मित्र बनविण्यासाठी संवत्सरी पर्व पाहिजे. मनमितसागरजी म.सा. म्हणाले की, पर्युषण पर्वात आराधना करुन मंदिर बनविले व आता क्षमायाचना करुन त्या मंदिरावर कलश चढविला आहे. कात्रीचे काम कपडे कापण्याचे असते तर सूईचे काम कपडे शिवण्याचे (जोडण्याचे) काम करते. तसेच एकामेकांना तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे कार्य करा. क्षमायाचना हा आमचा परमधर्म आहे. फक्त क्षमायाचना करताना ती अंतकर्णातून करा. असा संदेश महाराजांनी दिला.
प्रारंभी गुरुगौतम श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, जी.एम.बोथरा, महावीर पाटणी, प्रकाश बाफना, डॉ. प्रकाश झांबड, नगीनचंद संघवी, राजेश कांकरिया, मिठालाल कांकरिया, तनसुख झांबड, मारवाडी सभाचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम दरख, शेखर देसरडा, पंकज फुलफगर,अजित मुथियान, तेरापंथ सभाचे चांदमल सुराणा, मदनलाल आच्छा, अॅड. प्रेमचंद देवडा आदींनी सामुहिक क्षमापना केली. यावेळी तपस्या करणाºयांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आरती झांबड व मित्तल जैन यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रॉयल जैन ग्रुपचे अजित चंडालिया, पारस सांड, महेंद्र बंब,आशिष पोकर्णा, शांतीलाल लुणिया, राजेश संचेती, मुकेश गुगळे, योगेश देवडा व लब्ध कृपा महिला मंडळाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.