औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनी १४ जानेवारीला विविध पक्ष आणि संघटनांतर्फे अभिवादन रॅली काढल्या जाते. तसेच विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत काही बदल केले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार असल्याने जनतेस अडथळा, गैरसोय होऊ नये यासाठी दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. १) मिलिंद महाविद्यालय चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा प्रवेशद्वार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. २) ज्युबली पार्क ते विधि महाविद्यालय चौक हा रस्ता नामविस्तार दिनासाठी येणारी वाहने सोडून इतर वाहनांकरिता बंद राहील. ३) मकाई गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.
या कालावधीत पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा. १) मिलिंद चौकातून बेगमपुराकडे जाणारी सर्व वाहने मिलकॉर्नर, ज्युबली पार्क, मलिक अंबर चौकमार्गे जातील. २) बेगमपुर्याकडून मिलिंद चौकाकडे जाणारी वाहने मलिक अंबर चौक, ज्युबली पार्क, मिलकॉर्नर मार्गे मिलिंद चौकाकडे जातील. ३) या कार्यक्रमासाठी येणारी सर्व वाहने मिलिंद महाविद्यालयाचे मैदान व पी.ई.एस. अभियांत्रिकीच्या प्रांगणात उभे केले जातील. तसेच ही अधिसूचना बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, दंडाधिकारी, अत्यावश्यक सेवा यांच्या वाहनांना लागू राहणार नाही, असे सहा. पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी कळविले आहे.