औरंगाबाद : पालकमंत्री रामदास कदम यांची मंगळवारी उचलबांगडी करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी महापालिकेत वार्यासारखे पसरले. शिवसेनेतील कदम गटाच्या नगरसेवकांची अवस्था खैबरखिंडीत सापडल्यासारखी झाली आहे. महापालिकेत प्रथमच २४ नगरसेवक घेऊन चंचू प्रवेश करणार्या एमआयएम पक्षाचीही कदम यांच्यासोबत चांगलीच गट्टी होती. या पक्षाचीही महापालिकेच्या राजकारणात चांगलीच कोंडी होणार आहे.
२०१४ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यापासून आॅक्टोबर २०१७ पर्यंत पालकमंत्री कदम यांचेच वर्चस्व होते. शिवसेनेचा महापौर निवडतानाही पालकमंत्र्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्र्यंबक तुपे यांना १५ महिन्यांसाठी महापौर करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीच्या निवडणुकीतही मोहन मेघावाले यांना सभापती करून दिग्गज नगरसेवकांना आणि सेनेतील नेत्यांना कदम यांनी जोरदार धक्का दिला होता. सभागृहनेतेपदी प्रथम राजेंद्र जंजाळ, त्यानंतर गजानन मनगटे यांची वर्णीही त्यांनीच लावली होती. मागील तीन वर्षांपासून महापालिकेत खैरे गटाची अक्षरश: मुस्कटदाबी सुरू होती. हीच अवस्था आणखी काही वर्षे राहिली तर आपली राजकीय कारकीर्द संपेल, अशी भीती खैरे गटाला वाटत होती.
नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत अचानक खैरे गटाने मुसंडी मारत उमेदवारी ओढून आणली. नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडताच खैरे गटाचा उत्साह, विश्वास अधिक वाढला. महापालिकेच्या कारभाराचा रिमोट आपल्या हाती येताच खैरे यांनी कदम यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजनेसाठी कर्ज उभारणे आदी मुद्यांवरून खैरे यांनी थेट मातोश्रीवर वर्तमानपत्रांच्या कात्रणांसह अहवाल सादर केला. पक्षश्रेष्ठींनीही मंगळवारी खैरे गटाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे शहरात खैरे समर्थकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.
पालकमंत्री रामदास कदम यांनी मागील तीन वर्षांमध्ये मजलीस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला सोबत घेऊन राजकारण केले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कटकटगेट या मुस्लिमबहुल भागात एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र होर्डिंग लागले होते. स्थानिक एमआयएम नेत्यांसह शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांचे फोटोही होर्डिंगवर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अनेकांचा राजकीय अस्तनगरसेवक ते खासदारपदापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी मागील ३० वर्षांमध्ये प्रवास केला आहे. त्यांच्या तीन दशकीय राजकीय कारकीर्दीत जो कोणी अडसर ठरला त्याची उचलबांगडी त्यांनी केली. अनेक नेत्यांचा राजकीय अस्तही झाला.
महापालिकेचे विचित्र राजकारणऔरंगाबाद महापालिकेतील राजकारण हे अत्यंत विचित्र आहे. स्थानिक गुंतागुंती बाहेरच्या नेत्यांना आजपर्यंत कळल्या नाहीत. काँग्रेसच्या तत्कालीन वेगवेगळ्या पालकमंत्र्यांनीही येथील राजकारण पाहून कानाला खडा लावला होता. २०१० ते २०१५ मध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी युतीचा कडेलोट करून सत्ता स्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता; मात्र त्यांना यश आले नव्हते.