वाळूज महानगर : दर्शनासाठी मंदिरात जाणाऱ्या भाविकावर दोन चोरट्यांनी कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटे बजाजनगरातील संभवनाथ दिगंबर जैन मंदिरामसोर घडली. या हल्ल्यात शेखरचंद गंगवाल हे जखमी झाले आहेत. दरम्यान, मदतीसाठी मंदिरातील पुजारी धावल्याने हल्लेखोर गंगवाल यांची बॅग घेवून दुचाकीवरुन पसार झाले.
शेखरचंद शांतीलाल गंगवाल (५४, रा. सिडको वाळूज महानगर १) हे नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे दुचाकीवरुन बजाजनगरातील संभवनाथ दिगंबर जैन मंदिरात दर्शनासाठी जात होते.
महाराणा प्रताप चौकातून मंदिराकडे जात असताना त्यांच्या पाठीमागे दुचाकीस्वारुन दोघेजण येत होते. त्यांनी मंदिराच्या गेटसमोर दुचाकी उभी केली. त्याचवेळी या दोघांनी कोयता व लाकडी दांड्याने गंगवाल यांच्यावर हल्ला केला. गंगावाल यांनी आरडाओरड करत हल्लेखोरांचा प्रतिकार केला. एकाने गंगवाल यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी धाडस दाखवत त्याचा हल्ला परतवून लावला. त्याच वेळी दुसºयाने गंगवाल यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारला.
ही झटापट सुरु असताना गंगवाल यांची चांदीची माळ व पुजेचे साहित्य असलेली बॅग बाजूला पडली. त्यांच्या आवाजाने पुजारी मदतीला धावल्याने हल्लेखोर बॅग घेवून पसार झाले. गंगवाल यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घटलेल्या प्रकाराची पोलीसांना माहिती दिली असल्याची माहिती शेखरचंद गंगवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.