औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये बुधवारी सायंकाळी बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब गांभीर्याने घेत ‘सीआयएसएफ’च्या क्यूआरटी टीमने बॅगची तपासणी केली. तेव्हा बॅगमध्ये कोणतीही धोकादायक वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले. बॅगमध्ये दिरहम, डाॅलर आणि भारतीय रक्कम असे एकूण ९० हजार रुपये, पासपोर्ट होते. संबंधित प्रवाशाला संपर्क साधून ही बॅग परत करण्यात आली.
सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास विमानतळावरील पार्किंगमध्ये ही बॅग निदर्शनास पडली. तेव्हा उपनिरीक्षक मनोजकुमार आणि कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर डेप्युटी कमांडंट पवनकुमार यांच्या उपस्थितीत बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात २० हजार ५०० रुपये भारतीय मुद्रा, ८६१ डाॅलर, ११५ दिरहम, ९ पासपोर्ट, ७ डेबिट, क्रेडिट कार्ड होते. बोर्डिंग पासवरून संबंधित विमान प्रवाशाशी संपर्क साधून त्यास विमानतळावर बोलावण्यात आले. ओळख पटल्यानंतर प्रवाशाला ‘सीआयएसएफ’ने बॅग परत केली.