लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘पेट-४’ परीक्षा होत आहे. ही परीक्षा होईपर्यंत प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांना काम करू द्यावे लागेल. त्यानंतर त्यांची उचलबांगडी करता येईल. यासाठी किमान पंधरा दिवसांचा अवधी हवा आहे. तोपर्यंत उपोषण मागे घेण्याची विनंती चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले डॉ. बाबासाहेब भालेराव यांची शुक्रवारी भेट घेऊन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली. यानंतर डॉ. भालेराव यांनी कुलगुरूंनी स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतले आहे.विद्यापीठातील प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांची नेमणूक विद्यापीठ कायद्याचा भंग करणारी आहे. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी चार दिवसांपासून डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी गुरुवारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी पत्र देऊन डॉ. पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट-२०१६ नुसार केलेली नसल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय कुलगुरूंनी आपल्या अधिकारात घेतल्याचे स्पष्ट केले. तरीही डॉ. भालेराव यांनी उपोषण सुरूच ठेवले.यावेळी एसएफआयच्या प्राजक्ता शेटे, सुनील राठोड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राहुल तायडे, अमोल दांडगे आणि एनएसयूआयचे नीलेश आंबेवाडीकर यांनी जोरदार घोषणाबाजी केली. डॉ. पाटील यांना हटविल्याशिवाय उपोषण तर सुटणार नाहीच. उलट सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना आंदोलनात उतरणार असून, आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी डॉ. भालेराव यांनीही आक्रमक भूमिका घेऊन आपण मागणीवर ठाम असल्याचे म्हटले. यामुळे शेवटी कुलगुरूंनी पेट-४ परीक्षा होताच डॉ. सतीश पाटील यांची उचलबांगडी करणार असल्याची घोषणा करून डॉ. भालेराव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. डॉ. पाटील यांची उचलबांगडी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे डॉ. भालेराव यांनी अखेर उपोषण मागे घेतले.
प्रभारी अधिकाऱ्यांची ‘पेट’नंतर उचलबांगडी
By admin | Published: July 01, 2017 12:43 AM