छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शहरात हळूहळू इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. नागरिकांना वाहन चार्ज करण्यासाठी शहरात ५०० चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेने निश्चित केले आहे. या उपक्रमासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येतील. योग्य प्रस्तावाची पडताळणी करून त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महापालिका शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, मनपाच्या मोकळ्या जागा, विविध ठिकाणी असलेल्या पार्किंगसह खुल्या जागा, गृहनिर्माण सोसायटीतील मोकळी जागा, खेळाचे मैदान इ. ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. महापालिका संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून देईल. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत. कंपन्यांनी तयारी दर्शविल्यास त्यांच्यासोबत जागेचा करार करण्यात येईल. जागोजागी चार्जिंग स्टेशन उभारल्यामुळे नागरिकांना चार्जिंग करण्याची सोय उपलब्ध होईल. महापालिका संबंधित कंपनीकडून जागेचे भाडे, उत्पन्नातून रॉयल्टीसुद्धा घेईल, उत्पन्नाचा एक स्रोत मिळेल असा विश्वास जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. नागरिकांना जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्स मिळाले तर अधिक प्रमाणात ई-वाहनांचा वापर होईल, प्रदूषणही थांबेल, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील पहिला प्रकल्पराज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या दृष्टीने आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभारण्याची कारवाई कोणीही केली नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राहणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी नमूद केले.