छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्ण निधीत वर्षभरात कोट्यवधींची रक्कम जमा होते. मात्र, त्यातील अवघी ३० ते ४० टक्केच रक्कम गोरगरीब रुग्णांवर खर्च होत असल्याचे समोर आले आहे. नावालाच गोरगरिबांवर उपचार करून धर्मादाय रुग्णालयांत गोरगरिबांसाठी राखीव बेडवर पैसे कमविण्याचा प्रकार होत असल्याची ओरड होत आहे.
प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने ‘निर्धन रुग्णांचा निधी’ असा स्वतंत्र निधी निर्माण करणे आणि त्यात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्ण सोडून इतर सर्व रुग्णांच्या स्थूल देयकांची २ टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. ‘निर्धन रुग्णांचा निधी’ खात्यात जमा होणारी रक्कम ही संबंधित रुग्णालयाच्या स्वाधीन असते. या रकमेचा विनियोग फक्त निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचारावरच करणे बंधनकारक आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दहा टक्के खाटा निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, कोट्यवधींचा निधी तसाच पडून राहत असून वर्षभरात अवघ्या ६ हजार ते ७ हजार निर्धन, दुर्बल रुग्णांना उपचाराचा लाभ मिळत असल्याची स्थिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
जानेवारी ते जून २०२३ मधील स्थिती- निर्धन रुग्ण निधीत जमा झालेली रक्कम - ८ कोटी ५७ लाख ६२ हजार ९१२ रु.- निर्धन घटकातील रुग्णांच्या देयकांची खर्ची घातलेली रक्कम - ८८ लाख ४० हजार ३४९ रु.- दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकांची खर्ची घातलेली रक्कम- १ कोटी ३२ लाख २९ हजार ८८४ रु.- एकूण लाभार्थी रुग्ण - ३२९५- एकूण खर्च रक्कम- २ कोटी २० लाख ७० हजार २३४ रु.- शिल्लक रक्कम - ६ कोटी ३६ लाख ९२ हजार ६७८ रु.
जुलै ते डिसेंबर २०२३ मधील स्थिती- निर्धन रुग्ण निधीत जमा झालेली रक्कम - ९ कोटी ८८ लाख ९५ हजार ८३१ रु.- निर्धन घटकातील रुग्णांच्या देयकांची खर्ची घातलेली रक्कम -१ कोटी ६२ लाख ३१ हजार ८४८ रु.- दुर्बल घटकातील रुग्णांच्या देयकांची खर्ची घातलेली रक्कम- १ कोटी ४४ लाख ७६ हजार ७५०रु.- एकूण लाभार्थी रुग्ण -३८९६- एकूण खर्च रक्कम- ३ कोटी ७ लाख ८ हजार ५९५ रु.- शिल्लक रक्कम - ६ कोटी ८१ लाख ८७ हजार २४६ रु.- वर्षभरात निर्धन रुग्ण निधीत जमा झालेली रक्कम- १८ कोटी ४६ लाख ५८ हजार ७४३ रु.- वर्षभरात निर्धन, दुर्बल घटकातील रुग्णांवर खर्च झालेली रक्कम- ५ कोटी २७ लाख ७८ हजार ८२९ रु.- जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये-२२
ऑनलाइन प्रणालीद्वारे माॅनिटरिंगधर्मादाय रुग्णालयांसंदर्भात शासनाकडून पोर्टलद्वारे नियंत्रण ठेवण्याचे नियोजन केले आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे माॅनिटरिंग होईल. त्यानंतर यात काय सुधारणा होईल, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईल.
रुग्णांना योजनेचा लाभ मिळेनासर्व धर्मादाय रुग्णालयांत निर्धन, दुर्बल घटकांसाठी २ टक्के निधी खर्च करावा लागतो व हा निधी कोटी रुपयांमध्ये उपलब्ध असूनही गरीब, गरजवंत रुग्णांना हे सर्व हॉस्पिटल धर्मादाय योजनेचा लाभ देताना दिसून येत नाही. धर्मादाय कार्यालयात खूप तक्रारी येताना दिसून येतात. तरीही ही रुग्णालये मनमानी पद्धतीने बिल आकारतात.- कुंदन लाटे, मराठवाडा प्रदेश मुख्य समन्वयक, रुग्ण हक्क परिषद