महायुतीच्या रणनीतीवर मंथन; अमित शाहांची मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:16 PM2024-09-24T15:16:25+5:302024-09-24T15:21:14+5:30

महायुतीच्या जागा वाटपाचे सुत्र आज ठरणार

Chatrapati Sambhajinagar brainstorms on grand coalition strategy; Amit Shah's meeting with Chief Minister, two Deputy Chief Ministers | महायुतीच्या रणनीतीवर मंथन; अमित शाहांची मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह आज बैठक

महायुतीच्या रणनीतीवर मंथन; अमित शाहांची मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह आज बैठक

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात मंगळवारी (दि. २४) रात्री ९:३० ते ११ वाजेदरम्यान होणाऱ्या बैठकीत ठरेल, अशी माहिती भाजपच्या गोटातून समजली आहे.

भाजपचा मराठवाडा पदाधिकारी, नेत्यांचा मेळावा आटोपून केंद्रीय गृहमंत्री शाह जालना रोडवरील रामा हॉटेलमध्ये येतील. भोजनानंतर चौघांमध्ये विधानसभा निवडणुका, राज्य व मराठवाड्यातील जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चा होईल.

शिवसेना व भाजपाची २०१९ च्या निवडणुकीमध्ये युती होती. यावेळी खंडित शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती आहे. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी भाजपाने २६ जागा लढल्या व १६ जागांवर यश मिळवले. त्या १६ व शिंदेसेनेकडील ९ जागा वगळून उरलेल्या २१ जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांसह शिंदेसेना व भाजपाला किती जागा घ्यायच्या यावर या बैठकीत चर्चा होणे शक्य आहे. या चर्चेअंतीच पुढच्या महिन्यांत जागावाटपाचे अंतिम समीकरण ठरेल, असे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १७ तास शहरात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मंगळवारी सायंकाळी ६:१५ वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होईल. तेथून ते एमजीएम कॅम्पसकडे रवाना होतील. रुक्मिणी हॉलमध्ये सायं. ६:३० वाजता बैठकीला मार्गदर्शन करतील. तेथून रात्री ८ वा. ३५ मिनिटांनी ते रामा हॉटेलकडे रवाना होतील. रात्री ९:१५ वा. ते मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. बुधवार, २५ रोजी सकाळी ११ वा. विमानतळावरून विमानाने नाशिककडे रवाना होतील.

सध्याचे मराठवाड्यातील पक्षीय बलाबल असे...
भाजपा : १६
शिवसेना (शिंदे) : ९
ठाकरे गट : ३
काँग्रेस : ८
राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) : ८
अपक्ष : २

Web Title: Chatrapati Sambhajinagar brainstorms on grand coalition strategy; Amit Shah's meeting with Chief Minister, two Deputy Chief Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.