औरंगाबाद : जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांचा चातुर्मास दि.२९ जूनपासून सुरूहोत आहे. यानिमित्त चातुर्मास मंगल प्रवेश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आ. सुभाष झांबड यांच्या परिवारातर्फे सकाळी ८ वा. नवकाशी होऊन सिडको एन-२, फुलजन या निवासस्थानापासून चातुर्मास मंगल प्रवेश शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यात मान्यवरांची उपस्थिती राहील. खा. विजय दर्डा, छत्तीसगडचे मंत्री राजेश मुनोत, रतनलाल सी. बाफना, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, खा. राजकुमार धूत, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, महापौर कला ओझा, आ. प्रदीप जैस्वाल, आ. डॉ. कल्याण काळे, आ. प्रशांत बंब, आ. संजय शिरसाट, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी आमदार एम. एम. शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. आज दुपारी केशरबाग येथे झालेल्या एका पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी मिठालाल कांकरिया, रतिलाल मुगदिया, नवीनचंद जैन, प्रकाश बाफना, जी. एम. बोथरा, डॉ. शांतीलाल संचेती, महावीर पाटणी, तनसुख झांबड, जिनदास मोगले, प्रशांत देसरडा, भिकचंद डोसी आदींची उपस्थिती होती. केशरबाग येथे ही शोभायात्रा येईल. तेथून ती शंखेश्वर जैन मंदिर, एन-३ मध्ये जाईल. तेथून ती स्पेन्सर हॉल, प्रोझोनजवळ येऊन विसर्जित होईल. तेथे रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांचे प्रवचन होईल. परराज्यांतून आलेल्या सातशे भाविकांसह एकूण पाच हजार भक्तांचा सहभाग राहील. शोभायात्रा स्पेन्सर हॉल येथे आल्यानंतर सामाजिक, राजकीय व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल. तत्पूर्वी मंगल प्रवेश स्वागतगीत व पाठशाळा विद्यार्थ्यांचे नृत्य सादर होईल. याच कार्यक्रमात रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांनी गुजराथीत लिहिलेल्या ‘शिक्षणना दुधमा संस्कारनी साकर’ व ‘ शिक्षा के दूध में संसार की शक्कर’ या हिंदी पुस्तकाचे विमोचन होईल. प्रवचनानंतर झांबड ब्रदर्सतर्फे गौतम प्रसादी होईल. पंतप्रधान येणार...१४ नोव्हेंबरपर्यंत चालणारे हे चातुर्मास केशरबाग मंगल कार्यालयात दररोज सकाळी ८.४५ वा. सुरूहोऊन १० वा. संपेल. दर रविवारी म. सा. यांचे प्रवचन स्पेन्सर हॉल येथे होईल.चातुर्मासाच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन हे औरंगाबादला येऊन जाणार असल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आले. स्वत: रत्नसुंदरसुरीश्वरजी गुजरातचे आहेत. भारतात कुठेही त्यांचा चातुर्मास असला की नरेंद्र मोदी तेथे एकदा का होईना हजेरी लावत असतात.
उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत चातुर्मास मंगल प्रवेश शोभायात्रा
By admin | Published: June 28, 2014 1:06 AM