लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळीनिमित्त संगीताच्या मैफिलीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आमदार चव्हाण यांनी फटाक्याच्याच लडीला काडी लावली. आता या काडीमुळे राजकीय फटाके आवाज करतात की, फुसके निघतात. हेच पाहणे मजेशीर ठरेल.येत्या लोकसभेत निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे निवडून येणार नाहीत, असे विधान करतानाच चव्हाणांनी आपल्याही उमेदवारीचे घोडे दामटले. लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आपल्याही नावाचा विचार होऊ शकतो, असे सांगत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे ही लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार होऊ शकतात, असा सुतळी बॉम्ब फोडला. दिवाळीच्या मोहूर्तावर राजकीय आतषबाजीला सुरुवात झालेली आहे.पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, २०१४ साली ‘मोदी लाटे’त चंद्रकांत खैरे यांना जनतेने निवडून दिले. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर प्रभावी ठरणार नाही. तेव्हा खा. खैरे यांच्या विरोधातील नाराजीमुळे त्यांची लोकसभेत पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता धूसर आहे. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास अन् पक्षाने आदेश दिला तर खासदारकी लढविण्याचे संकेत देत चव्हाण यांनी औरंगाबाद लोकसभेच्या राजकारणात एन्ट्री केली.आगामी लोकसभा निवडणुकांविषयी बोलताना ते म्हणाले की, निवडणुकांना आणखी दीड वर्ष बाकी आहे. त्यामुळे त्याविषयी आताच भाकीत वर्तविणे कठीण आहे. या सर्व पवित्र्यावरून खा. खैरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.
चव्हाणांची फटाक्याच्या लडीला काडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:23 AM