लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत केली. त्यांनी आपला राजीनामा बँकेचे ज्येष्ठ संचालक बापूसाहेब गोरठेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेना- भाजपा, राष्टÑवादीने एकत्र येत निवडणूक लढविली होती. सत्तेत आल्यानंतर प्रत्येक पक्षाला एक वर्षाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यावर्षी अध्यक्षपद राष्टÑवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांनी भूषविले. त्यांनी वर्षभराच्या आतच राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. चिखलीकर यांचा वर्षभराचा कार्यकाळ हा आॅगस्टअखेर संपला होता. मात्र सर्वसाधारण सभेमध्ये बोलण्यासाठी चिखलीकर यांनी आपला राजीनामा दिला नव्हता. सोमवारी शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत चिखलीकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.या सर्वसाधारण सभेत बँकेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला. आ. चिखलीकर यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत जिल्हा बँकेची २२ कोटींची थकित वसुली झाल्याचे सांगितले. तसेच पद्मश्री श्यामराव कदम यांचा पुतळा उभारणीचा प्रश्नही मार्गी लागल्याचे ते म्हणाले. या पुतळ्याचे उद्घाटन नेत्यांच्या तारखा न मिळाल्यामुळे होऊ शकले नाही. ते आचारसंहिता संपल्यानंतर निश्चितपणे होईल असे सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनीही पुतळ्याचा प्रश्न आ. चिखलीकरांनी मार्गी लावल्याचे सांगितले. सरकारकडून बँकेला योग्यवेळी मदत मिळाल्यास बँकेची परिस्थिती निश्चितपणे सुधारणार आहे. बँकेचे ४७ कोटी रुपये शासनाकडे थकित आहेत. कर्जमाफीबाबत शासनाचे धोरण अनिश्चित आहे. आम्हाला कर्जमाफी नको मात्र सामान्य शेतकºयांना सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले.बँकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजय कदम यांनी बँकेचा आर्थिक लेखाजोखा सर्वसाधारण सभेत सादर केला.यावेळी बँकेचे संचालक बापूसाहेब गोरठेकर, लक्ष्मण ठक्करवाड, ईश्वरराव भोसीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, दिनकर दहीफळे, गंगाधर राठोड, सुशांत चव्हाण, जिजाबाई चव्हाण, उपनिबंधक फडणीस आदींची उपस्थिती होती.
बँक अध्यक्षपदाचा चिखलीकरांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:21 AM