----
विद्यापीठात शिवभोजन
थाळी सुरू करण्याची मागणी
--
औरंगाबाद : शासनाकडून सुरू असलेल्या शिवभोजन योजनेतून विद्यापीठ परिसरातही केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केंद्र सुरू करण्याची मागणी केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
जिल्हा परिषदेचे
इंटरनेट कनेक्शन कापले
--
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या दालनाच्या इंटरनेट कनेक्शनचे बीएसएनएलचे बिल थकल्याने कनेक्शन कट करण्यात आले. तर काही अधिकाऱ्यांनी वैयक्तिक बिले भरली तर काहींनी आपत्कालीन कक्ष म्हणून संबंधावर कनेक्शन सुरू ठेवले आहे. मात्र, निधीची तरतूद होत नसल्याने तेही इंटरनेट कनेक्शन कापले जाण्याची शक्यता आहे.
---
गोगाबाबा टेकडी रस्त्यावर
स्वच्छतागृह उभारण्याची गरज
--
औरंगाबाद : गोगाबाबा टेकडी परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या परिसरात सोयीसाठी पर्यावरणपूरक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी विद्यापीठ अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांनी केली. तर परवानगी दिल्यास कंपन्यांच्या सीएसआर फंडातून हे बांधता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
---
छावणीचा रस्ता झाला खडतर
---
औरंगाबाद : छावणीतील मुख्य रस्त्याची खड्ड्यामुळे चाळणी झाल्याने वाहनधारकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. तर रस्त्याच्या कडेला कचरा पडून असल्याने खड्डे बुजविण्यासह स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.