लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करावे, तेथील दुकानदारांप्रमाणे दरमहा ३५हजारांचे मानधन द्यावे, ई-पॉस मशीनमधील डाटा दुरुस्ती करून द्यावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत. हिंगोलीतही १ आॅगस्टपासून हा संप सुरू आहे.स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व तहसील कार्यालयांना याबाबत निवेदने दिली होती. त्यात तामिळनाडू राज्यात स्थापन करण्यात आलेल्या अन्न महामंडळाप्रमाणे महाराष्ट्रातही महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांना सामावून घेऊन त्यांना दरमहा ३५ हजार रुपये मानधन द्यावे, अशीही मागणी आहे. तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ई-पॉस मशिनचा वापर सक्तीचा करण्यात येत असला तरीही त्यावरील डाटा बेस चार ते पाच वेळा दुरुस्त करूनही प्रत्यक्षात मशिनवर चुकीचाच येत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे एपीएलचे लाभार्थी बीपीएलमध्ये तर बीपीएलचे एपीएलमध्ये येत आहेत. यात कहर म्हणजे अन्नसुरक्षाच याद्यांतील लाभार्थ्यांच्या नावासमोर तर धान्यच दिसत नाही. काही ठिकाणी एकाच गावात दोन ते तीन दुकाने आहेत. त्यामुळे दुकानदारांकडील युनिट रजिस्टरमधील लाभार्थीसंख्येतील अनेक लाभार्थी दुसºया दुकानास जोडले गेले आहेत. त्यामुळे धान्य एका दुकानास अन् लाभार्थी भलतीकडेच असा प्रकार घडत आहे.याबाबत प्रशासनाकडे गाºहाणे मांडले की, दुरुस्ती करून घेण्यास सांगितले जाते. आॅपरेटरकडे बसून दुकानदार दुरुस्ती करुन घेतात. प्रत्यक्षात मात्र चुकीच्याच याद्या ई-पॉस मशिनवर दिसतात. त्यामुळे दुकानदारांनाही काही मेळ लागत नाही.शासनाने यापूर्वीही स्वस्त धान्य दुकानदारांना नुसतीच आश्वासने दिली. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत संघटना स्वस्थ बसणार नाही. जिल्ह्यातील सर्व दुकानदार या संपात सहभागी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भिकूलाल बाहेती, अशोक काळे, नवनाथ कानबाळे, फारुख खाँ मुनेरखाँ पठाण, नागेश बांगर, अमित बांगर, भाऊराव मुटकुळे, संजय खंडेलवाल आदींनी सांगितले.
स्वस्त धान्य दुकानांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:57 PM