रशिया-युक्रेनच्या धर्तीवर राज्यात स्वस्त वैद्यकीय शिक्षण;अमित देशमुखांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 04:30 PM2022-03-01T16:30:10+5:302022-03-01T16:39:30+5:30
Amit Deshmukh: शुल्क रचनेच्या अभ्यासाबाबत राज्य सरकारच्या समितीचे काम सुरु असून लवकरच अहवाल प्राप्त होईल
औरंगाबाद: युक्रेन आणि रशियामध्ये ( Russia Ukrain) वैद्यकीय शिक्षण शुल्क अत्यंत कमी असल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तेथे जातात. याच धर्तीवर राज्यातही स्वस्त वैद्यकीय शिक्षण देता येईल का ? यासाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली आहे. ही समिती युक्रेन-रशियातील वैद्यकीय शिक्षण शुल्काचा अभ्यास करून, त्यासंबंधी लवकरच अहवाल देईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज दिली.
काँग्रेसचा डिजिटल सदस्य नोंदणी अभियान आणि मराठवाडा विभागीय मेळावा व आढावा बैठकीचे आज औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंत्री अमित देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतातील भरमसाठ वैद्यकीय शिक्षण शुल्कावर भाष्य केले. रशिया आणि युक्रेनमधील स्वस्त वैद्यकीय शिक्षणावर बोलतांना मंत्री देशमुख यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. युक्रेन आणि रशियाच्या वैद्यकीय शुल्क रचनेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती काम करीत आहे. त्या देशाप्रमाणेच राज्यात कमी शुल्क लावता येतील का ? याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. समितीचा अहवाल आला की तो राज्यासमोर मांडला जाईल असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.
भारताच्या तुलनेत २५ टक्के स्वस्त शिक्षण
भारतापेक्षा कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण देणारा देश म्हणून युक्रेन आणि रशियाची ओळख आहे. यामुळेच येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर हजारो भारतीय विद्यार्थी तिकडे अडकले आहेत. यामुळेच या देशांतील स्वस्त वैद्यकीय शिक्षणाबाबतही चर्चा सुरु झाली आहे. भारतात खासगी शिक्षणसंस्थेत एका विद्यार्थ्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चाच्या तुलनेत सुमारे २५ टक्के खर्चात तेथे वैद्यकीय पदवी मिळवता येते.