छत्रपती संभाजीनगर : सामान्यांना स्वस्तात वाळू मिळणे हे दिवास्वप्न असल्याच्या तक्रारी होत असतानाचा आता शासनाने वाळू डेपो व्यवस्थापनाचा खर्च ग्राहकांच्या माथी मारला आहे. त्यामुळे स्वस्त वाळूचे धोरण गेल्या वर्षीपुरतेच होते की, काय अशी चर्चा आहे.
उत्खनन प्रतिब्रास १३४५, डीएमएफ ६६०, एसआय चार्ज १६ असे २ हजार ३१ रुपये वाळू डेपोत भरावे लागतील. कालपर्यंत १,३७१ रुपयांमध्ये प्रतिब्रास वाळू डेपोतून मिळायची. १० हजार १५५ शासन रॉयल्टीसह भरल्यानंतर इंधन ५ हजार, १,५०० रुपये वाळू धुण्यासाठी, १ हजार रुपये जेसीबीचे भाडे देऊन सामान्यांना वाळू आणावी लागणार आहे. १९ हजारांपर्यंत हा खर्च नियमाने वाळू घेतली तर जाणार आहे. परंतु या दरांमध्येही वाळू सामान्यांना मिळणे अवघड होणार आहे. कारण वाळूडेपोतून अनेकांनी ऑनलाइन बुकिंग करून आयडी पावती स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. वाळू ऑनलाइन बुक करून आयडी पावती घेतली जात आहे. ज्यांच्याकडे आयडी पावती आहे, ते ६,५०० रुपयांची वाळू इतरांना १६ हजार रुपयांना देतात. तेथून मग इंधन ५ हजार, १ हजार ड्रायव्हर, १,५०० रुपये वाळू धुण्यासाठी, १ हजार जेसीबीचे भाडे मिळून साधारणत: २५ हजारांपर्यंत खर्चावर आणली जाते. त्यानंतर सामान्यांना ७ ते ८ हजार रुपये प्रतिब्रासने वाळू मिळू शकते. वाळूखरेदीसाठी ग्राहकांना सेतू सुविधा केंद्रात २५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करावी लागते. रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्रासह मोबाइल क्रमांक लागेल. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देणे बंधनकारक आहे.
वाळू आणण्याचा प्रवास असा...फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यांतील एकूण ११ वाळू वाळूपट्ट्यांमधून ६५,३२७ ब्रास वाळू मिळेल. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे गेवराई (गुंगी) येथे ६,०१३ ब्रास, पैठण तालुक्यात नांदर भाग १, भाग २, भाग ३, नवगाव भाग २ आणि ब्रह्मगाव येथील ब्रह्मगाव डेपोत सर्व घाट मिळून २३ हजार ५९२ ब्रास, सिल्लोड तालुक्यात धानोरा वाळू वाळूपट्ट्याच्या मोढा खु. डेपोवर ५०८८ ब्रास, वैजापूर तालुक्यात पूरणगाव, भालगाव, अव्वलगाव, नागमठाण घाटावरील डाग पिंपळगाव डेपोवर ३०,६३४ ब्रास वाळू उपलब्ध होईल. नोंदणीनंतर बुकिंग आयडीची पावती वाळू डेपोवरील मॅनेजरला देऊन वाहतूक पावती घ्यावी लागते. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या ग्राहकाकडे आहे. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत डेपोमधून वाळू नेणे बंधनकारक आहे.
खनिकर्म विभाग काय म्हणतो?वाळू डेपो मॅनेजमेंटचा खर्च ग्राहकांना द्यावा लागणार आहे. गेल्या वेळी मॅनेजमेंटचा खर्च शासनाने केला. आता उत्खनन, वाहतूक, दक्षता, ऑनलाइन सिस्टिमचा खर्च ग्राहकांना द्यावा लागणार आहे. ६०० ते ७०० रुपयांच्या आसपास हा खर्च असेल.- किशोर घोडके, जिल्हा खनिकर्म अधिकारी