वाळूज महानगर : ट्रॅक्टरवर दुचाकीचा क्रमांक टाकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि.९) पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली होती. तीसगाव-वडगाव रस्त्यावर दुपारी ट्रॅक्टर ( एमएच २० डीवाय २२०८) अडवून पोलिसांनी चालक सचिन विनायक उंबरे (२५, रा. तिसगाव परिसर) याच्याकडे कागदपत्राची मागणी केली. चालक उंबरे याने कागदपत्रे नसल्याचे सांगून ट्रॅक्टर मालक समाधान आहेर (रा. तिसगाव) असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन क्रमांकाची खात्री केली असता हा क्रमांक दुचाकीचा असल्याचे स्पष्ट झाले. ही दुचाकी मयूर विलासराव जाधव (शिवेश्वर कॉलनी, हर्सूल) याच्या नावावर असल्याचे समोर आले. आहेरने ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर एका कंपनीत भाडेतत्त्वावर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टरची पासिंग न झाल्याने दुचाकीचा क्रमांक ट्रॅक्टरवर टाकला. पोकॉं. सतवंत सोहळे यांच्या तक्रारीवरून आरोपी मालक समाधान आहेर व चालक सचिन उंबरे या दोघाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------------------