उस्मानाबाद : एका महिलेला विमा रक्कमेचे ४ लाख ८८ हजार मिळणार आहेत़ त्यासाठीचे १३ हजार ८०० रूपयांचे चलन कोषागार कार्यालयात भरावे लागणार असल्याचे सांगत पैशाची मागणी करणाऱ्या महाठगाचा डाव महिलेच्या सर्कतेमुळे उधळला़ हा प्रकार बुधवारी दुपारी उस्मानाबाद शहरातल समता नगर भागात घडला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगर भागात राहणाऱ्या रत्नमाला शंकर फुगारे यांच्या घरी बुधवारी दुपारी एक अनोळखी इसम आला़ त्या इसमाने ‘विम्याचे ४ लाख ८८ हजार रूपये कोषागार कार्यालयाकडून मिळणार असल्याची बतावणी केली़ तसेच त्या रक्कमेसाठी १३ हजार ८०० रूपयांचे चलन भरावे लागणार असल्याचे सांगून पैशांची मागणी केली़’ ऐनवेळी रत्नमाला फुगारे यांनी सतर्कता दाखवून पैसे देण्यास नकार केला़ त्यानंतर फुगारे यांनी स्वत: गुरूवारी कोषागार कार्यालय गाठून घडला प्रकार कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर मांडला़ त्यावेळी त्या महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने केल्याचे समोर आले़ या घटनेनंतर ‘सतर्कता बाळगून सेवानिवृत्तीधारक, कुटूंब निवृत्तीधारकांनी वरील प्रमाणे कोणी पैसे मागत असेल तर त्याच्या आश्वासनाला बळी पडू नये, कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा’ असे आवाहन कोषागार अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केले आहे़ (प्रतिनिधी)
फसवणुकीचा डाव उधळला
By admin | Published: April 22, 2016 12:12 AM