लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत प्रभाग २ मध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जमा होणाºया वोटींग स्लीपची मोजणी करण्याचा निर्णय महापालिका निवडणूक विभागाने घेतल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.राज्यात पहिल्यांदाच नांदेड महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. प्रभाग २ मधील ३७ मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाईल. मतदानानंतर मतमोजणीच्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनमधील वोटर स्लीप मोजायच्या का नाहीत याबाबत निर्णय झाला नव्हता. राज्य निवडणूक आयोगाने त्या संबंधीचे आदेश महापालिकेला दिले आहेत. प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनवर झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅटमधील वोटर स्लीप यांची संख्या जुळली तर केंद्रावरील मतदान योग्य प्रमाणात झाले हे स्पष्ट होणार आहे. या दोन्ही संख्यामध्ये तफावत आल्यास मात्र संभ्रमाची स्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. या संदर्भातील सूक्ष्म आखणी केली जात असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदाराला आपण कोणाला मतदान केले हे लगेच दिसणार आहे. त्याचवेळी सदर मतदाराने केलेली वोटर स्लीप व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जमा होणार आहे.मतदान केंद्रावर झालेले एकूण मतदान आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जमा झालेल्या वोटर स्लीपची संख्या एकच येणे आवश्यक आहे. प्रभाग २ मध्ये ३७ मतदान केंद्रावर प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपॅटचा वापर केला जात आहे. नागरिकांमध्येही मशीनबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे़दरम्यान, शहरात मनपा निवडणुकीसाठी ५५० मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. एका प्रभागासाठी सरासरी २५ ते ३० मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्र हे तळमजल्यावर प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान केंद्र अधिकारी, एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे तर मुस्लिम बहुसंख्य मतदान केंद्रावर एक महिला कर्मचारी देण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ६० क्षेत्रीय अधिकारी, ६३५ मतदान केंद्राध्यक्ष, १९५५ मतदान अधिकारी आणि १६५ महिला मतदान अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिका निवडणूक विभागाने मतदान अधिकारी, कर्मचाºयांना दुसरे प्रशिक्षण ३ आॅक्टोबरपासून देण्यात येत आहे. ४ आॅक्टोबर रोजी ते पूर्ण होईल. पहिले प्रशिक्षण २१ सप्टेंबर, २२ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर रोजी देण्यात आले़ मतदान अधिकारी कर्मचाºयांना १० आॅक्टोबर रोजी शेवटचे प्रशिक्षण दिले जाईल तसेच साहित्य वाटप केले जाणार आहे़
व्हीव्हीपॅटची व्यावहारिकता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:42 AM