छत्रपती संभाजीनगर : आठवडाभर शहरात बिबट्याची दहशत व सोशल मीडियावर धूम सुरू राहिली. उल्कानगरी, शंभूनगर, प्रोझोन मॉल आणि परिसरात बिबट्यासाठी धडाधड पिंजरे आणून त्यात बोकड ठेवले गेले. जुन्नरहून रेस्क्यू पथक बोलवावे लागले. ७० अधिकारी, कर्मचारी आठ दिवस अखंड शोध घेत होते पण बिबट्या सापडला नाही. बहुधा आता तो शहराबाहेर गेल्याचा अंदाज आहे. पण त्याची ही सहल वन विभागाला जवळपास दोन लाखांवर खर्चात टाकणारी ठरली.
देवळाई परिसर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, सिडको, हायकोर्ट परिसर, देवानगरीसह कॉल आलेल्या ठिकाणी सकाळी आणि रात्रीची गस्त सुरू आहे. सोलापूर हायवेपर्यंतही वन कर्मचारी व अधिकारी टेहळणी करीत आहेत. मात्र, या सगळ्या मोहिमेनंतरही बिबट्या गेला कुठे, असा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे.
साधारण खर्च झाला कशावर ?- पाच पिंजरे-पाच बोकड- त्यांचे चारा पाणी- बाहेरून आलेले पथक- त्यांची गस्त-ट्रॅप कॅमेरे- सर्चिंग ऑपरेशन-पशुवैद्यकीय टीम- वाहनांचे इंधन
यासह बरेच काही असा वनविभागाचा २ लाखांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. परंतु त्याविषयी कोणतीही अधिकृत टिपण वन विभागाने जारी केलेले नाही.