वाळूज महानगर : करोडीनंतर ऐतिहासिक भांगसी माता गडालगत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन करोडी शिवारातील घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या परिसरात मोकळ्या भूखंडावर सर्रासपणे रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असून, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण आहे.
वाळूज उद्योनगरीतील काही कंपन्यांनी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राजकीय वरदहस्त लाभलेल्या ठेकेदारामंडळींवर सोपविली आहेत. कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाणी टँकरद्वारे छुप्या पद्धतीने शेतजमिनी, मोकळे भूखंड, तलाव तसेच नदी-नाल्यात सर्रासपणे सोडले जात आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या तक्रारी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या आहेत. मात्र, प्रदुषण मंडळाचे अधिकारी सांडपाण्याचे नमुने घेतात. मात्र, या नमुन्याचा प्रयोगशाळेचा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. भांगतीमाता गडाजवळील गट क्रमांक २४ मध्ये घातक रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याची माहिती मंगळवारी नागरिकांना मिळाली. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्यामुळे एस.एस.पवार, सरपंच नंदाबाई कान्हेरे, परसराम कान्हेरे, भाऊसाहेब आधाने, सुनिल कान्हेरे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.करोडी शिवारात सोमवारी आणि शरणापूर शिवारातील भांगसीमाता गडाजवळ मंगळवारी घातक रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी महसूल विभागाकडे केली होती. मंडळ अधिकारी के. एल. गाडेकर, तलाठी डी. डी.सोनवणे, ग्रामसेवक कटारे, एकनाथ सांगळे आदींनी करोडी भागाची पाहणी केली. यात जवळपास १६ टँकर रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचे दिसून आल्याने पथकाने पंचनामा केला. या विषयी प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कदम व क्षेत्रीय अधिकारी डॉ.गजाजन खडकीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
रसायनयुक्त सांडपाण्याची पाझर तलाव, जमिनी, मोकळे भुखंड आदी ठिकाणी विल्हेवाट लावली जात आहे. ते जमिनीत पाझरुन परिसरातील विहिरी, बोअर, हातपंप आदीचे पाणी दूषित झाले आहे. परदेशवाडी व रांजणगाव पाझर तलावही प्रदूषित झाले आहे. खाजगी जमिनीही यामुळे नापीक होण्याची भिती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे या सांडपाण्यामुळे जनावरांच्या जिवितासही धोका निर्माण झाला आहे.