छत्रपती संभाजीनगर : भारतीय आंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अथक कष्टामुळे आणि कोट्यवधी भारतीयांची डोळे लागून असलेल्या भारताची चांद्रयान - ३ मोहीम बुधवारी यशस्वी ठरली. या मोहिमेत छत्रपती संभाजीनगरचा भूमीपत्राचे जसे योगदान आहे. तसेच योगदान येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचे आहे. कारण सीटीआर कंपनीध्ये निर्मित कॅपॅसिटर्सचा वापर चांद्रयान ३ साठी करण्यात आला होता.
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो)ने जुलै महिन्यात चांद्रयान-३ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामुळे संपूर्ण देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली. आता बुधवारी भारताचे चांद्रयान विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि इस्त्रोंच्या शास्त्रज्ञांचे परिश्रम सार्थ ठरले. हम भी कुछ कम नही, हे जगाला दाखविणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशामध्ये छत्रपती संभाजीनगरातील सीटीआर कंपनीत तयार झालेल्या कॅपॅसिटर्सचा वापर करण्यात आला होता. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग जगताच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला. सीटीआर कंपनीचे संस्थापक स्व. प्रताप कुमार यांनी स्थापित केलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील सीटीआर मॅन्युफॅक्चर कंपनी देशातील लष्कर, नौदल आणि वायुदल यांना लागणारे कॅपॅसिटर पुरवणारी देशातील एकमेव मान्यताप्राप्त पुरवठादार कंपनी आहे.
हे कॅपॅसिटर पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत कंपनीचे मानद अध्यक्ष के. के. नोहरिया, अध्यक्ष बी.एम. सूरी, उपाध्यक्ष अनिल कुमार, व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. वाकचौरे, संचालक आर. व्ही. तळेगावकर व प्राजक्ता कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादित करण्यात आले. या कॅपॅसिटरचा वापर इस्त्रोने चांद्रयानासाठी केला. कंपनी त्यांच्या पुणे व नाशिक येथील कारखान्यांमध्ये वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून इतरही बऱ्याच उत्पादनांची निर्मिती करण्यात कार्यरत आहे. कंपनीने हाय व्होल्टेज ऑनलोड टॅपचेंजरच्या चाचणीसाठी नाशिक येथे विकसित केलेली आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा परीक्षण व संशोधन मंडळाची मान्यता प्राप्त केलेली या उपखंडातील पहिलीच प्रयोगशाळा ठरली आहे.