औरंगाबाद : छत्रपती पुरस्कार विजेते उद्योजक संजय चंद्रकांत मोरे यांच्या खात्यात जमा केलेली कर्जाची रक्कम परस्पर वेगवेगळ्या लोकांना अदा करून १ कोटी २८ लाख ६८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी जी. एस. महानगर बँकेच्या अध्यक्ष, संचालकांसह अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला.
बँक अध्यक्ष उदय शेळके (रा. मुंबई), व्यवस्थापकीय संचालक कांचन, तत्कालीन व्यवस्थापक गुंड, तत्कालीन व्यवस्थापक कुमार नरवडे, शरद नरवडे (रा. पुणे) विद्यमान संचालक बँकेचे कर्ज वितरण अधिकारी आणि ज्योतीनगर शाखेच्या व्यवस्थापकाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. तक्रारदार संजय मोरे यांचा सिडकोमध्ये उच्च दर्जाची साई अकॅडमी व्यायामशाळेचा व्यवसाय आहे. ज्योतीनगर येथील जी. एस. महानगर बँकेत त्यांची विविध खाती होती. २०१५ मध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी बँक सुमारे साडेतीन कोटी रुपये कर्ज देऊ शकते, असे सांगितले. जुनी व्यायामशाळेची इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यासाठी सव्वाकोटी, व्यायामशाळेच्या साहित्यासाठी एक कोटी आणि व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून एक कोटी, असे या कर्जाचे स्वरूप ठरले. त्यानुसार कर्ज मंजुरीचे पत्र २२ मे २०१५ रोजी बँकेने त्यांना दिले होते.
बँके वर विश्वास ठेवून मोरे यांनी सिडकोतील व्यायामशाळेची इमारत पाडून बांधकाम करण्यासाठी ठेकेदाराचा शोध सुरू केला. दरम्यान, त्यांनी मागणी करण्यापूर्वीच बँकेने त्यांच्या कर्ज खात्यात पहिला हप्ता म्हणून पन्नास लाख रुपये जमा केले. बांधकाम प्राथमिक स्तरावर असतानाच बँकेने एक कोटी रुपये खात्यात वितरित केले. विशेष म्हणजे ही रक्कम द्यावी, अशी मागणीही मोरे यांनी बँकेकडे केली नव्हती आणि त्याच दिवशी त्यांच्या खात्यातून ३७ लाख २३ हजार रुपये साई दत्त इन्फ्राच्या बँक खात्यात तर ९१ लाख ४५ हजार रुपये साई दत्त इन्फ्रास्ट्रक्चर या बँक खात्यात दोन धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही फर्मशी मोरे यांचा कोणताही संबंध नव्हता. ही रक्कम कर्ज खात्यातून परस्पर वर्ग करण्यात आल्याबद्दल मोरे यांनी बँकेला जाब विचारताच चूक झाल्याचे सांगून तुमचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही, असे बँकेने त्यांना सांगितले. या रकमा वगळता कर्जाची उर्वरित रक्कम घेऊन बांधकाम करा, असे सांगितले. मात्र बँकेने त्यांच्या रकमेची परतफेड केली नाही.
पत खराब होऊ नये याकरिता भरली रक्कमदरम्यान बँकेने त्यांना कर्ज वसुली नोटीस पाठवून एक कोटी रुपये कर्ज खात्यात जमा करण्यास सांगितले. ही रक्कम न भरल्यास तुमचे खाते बुडीत खात्यात जाईल आणि तुमची पत खराब होईल. बँके कडून चुकून दुसऱ्या खात्यात पाठविलेली रक्कम येईपर्यंत ही रक्कम भरा, असे बँकेच्या अध्यक्ष, संचालक आणि व्यवस्थापकांनी त्यांना सांगितले.४ बँकेशी जुने संबंध असल्याने तसेच पत खराब होऊ नये, याकरिता मोरे यांनी त्यांच्या अन्य खात्यातून कर्ज खात्यात एक कोटी रुपयांचा भरणा केला. शिवाय त्यांनी न उचलेल्या कर्ज रकमेवरही बँकेने व्याजही लावले. हे सगळे करताना बँकेने बनावट नोंदी कर्ज खात्यावर घेतल्या. बँकेने कट रचून आपल्याला फसविल्याचे मोरे यांच्या लक्षात आले.
अन्य ग्राहकांच्याही तक्रारी : दरम्यान बँकेने त्यांच्याप्रमाणे अन्य ग्राहकांनाही अशाच प्रकारे फसविल्याचे मोरे यांना समजले. त्यांनी याविषयी सिडको पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री फिर्याद नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे तपास करीत आहेत.