छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांना हाप्ते देण्यात येतात. या वसुलीतून महिन्याकाठी ६० ते ८० लाखांचा हप्ता पोलिसांना मिळतो,असा आरोप करीत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत हप्ते देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची यादीच जाहीर केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासोबतच तीन खाजगी व्यक्तींची नावे जाहीर करीत या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.
आ. दानवे यांनी तीन दिवसापूर्वी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून शहरातील अवैध धंदे वाल्यांकडून शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या हाप्तेखोरीबद्दल तक्रार केली होती. यापार्श्वभूमीवर गुरूवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत गुटखा व्यापारी, गावठी दारू, मटकाचालक, अनधिकृत लॉटरी,मुरूम तस्करी, वाइन शॉप, बीअर शॉपीचालक, वाळू व्यवसायिकांकडून पोलिसांना किती हाप्ता मिळतो, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी कोण, किती हाप्ता देतो,याबाबतची यादीच जाहिर केली. एवढेच नव्हे तर तीन खाजगी व्यक्तीमार्फत ही वसुली केली जात असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात टाचणी जरी पडली तरी पोलिस आयुक्तांना माहिती व्हायला हवे, असे असताना एवढी मोठी हाप्तेखोरी सुरू असेल आणि याची पोलीस आयुक्तांना माहिती नसावी, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर पोलीस आयुक्तांना हे माहिती नसेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करून हे थांबवावे,अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
किराडपुरा जाळपोळीस पोलिसही जबाबदारआज गुरूवारी पुन्हा पत्रकार परिषदेत शहर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. ते म्हणाले की, किराडपुरा जाळपोळ घटना घडण्यापूर्वी सायंकाळी ७ वाजता झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर रात्री दिड वाजेची घटना घडली नसती. एवढेच नव्हे दिड वाजता जेव्हा मोठा जमाव चालून आला तेव्हा पोलीस नियंत्रण कक्षाला नागरीकांनी आणि पोलिसांनी अनेक कॉल केले. नियंत्रण कक्षातील पोलिसांनीही पोलीस आयुक्तांना कॉल केला होता, मात्र त्यांनी दिड तास प्रतिसाद दिला नव्हता, यामुळे याघटनेस समाजकंटकासोबतच शहर पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.