छत्रपती संभाजीनगर: सलग नऊ दिवस बेमुदत उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने 2 नोव्हेंबरच्या रात्रीपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे हे शनिवारी दुपारी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले.
मराठा समाजाला सरसकट 50% च्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सलग 17 दिवस उपोषण केले. हे उपोषण स्थगित केल्यानंतर चाळीस दिवसानंतर त्यांनी पुन्हा सलग नऊ दिवस बेमुदत उपोषण केले .या उपोषणादरम्यान काही दिवस त्यांनी पाणीही न पिल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. या दरम्यान राज्य सरकारने त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितल्याने झालेल्या चर्चा अंती 2 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांनी उपोषण पुन्हा स्थगीत केले होते. त्या दिवशीपासून ते छत्रपती संभाजी नगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांनी घेतली भेटयुवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली . यावेळी त्यांच्यासोबत आप्पा साहेब कुडेकर यांची उपस्थिती होती सुमारे वीस मिनिटे संभाजी राजे यांनी मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली.
24 डिसेंबर हीच मुदतरुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दोन दिवसापासून नेत्यांची रुग्णालयात रांग लागली आहे. शनिवारी सकाळी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटले शासनाने काढलेला 3 नोव्हेंबर रोजीचा मराठा आरक्षणा संबंधी नवा जीआर राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाटील यांना दिला. यावेळी शिष्टमंडळात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि आमदार नारायण कुचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि रमेश पवार होते. यावेळी जरांगे पाटील यांनी जीआर वाचून सरकारला 24 डिसेंबर पर्यंतच मुदत दिल्याचे स्पष्ट सांगितले सरकारला वेळ अपुरा पडत असेल तर वाढीव मनुष्यबळ घ्या आणि वेळेतच काम पूर्ण करा अशी सूचनाही त्यांनी शिष्टमंडळाला केली.