छत्रपती संभाजीनगर : शहरातील दहा मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात राजरोसपणे गुटखा, सिगारेटची विक्री सुरू होती. मंगळवारी अचानक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ४७ पानटपऱ्या, ४५ हॉटेल आणि शेड, १८ हातगाड्या आणि रस्त्यावर उभे असलेल्या पाच भंगार टेम्पोचा अक्षरश: चेंदामेंदा करण्यात आला. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, दुसऱ्या टप्प्यात सिडको-हडको, बीड बायपासवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेसच्या आसपास पानटपऱ्यांवर दिवसभर उनाड तरुण गुटखा खातात, सिगारेट ओढत बसतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या तरुणींची ते छेड काढतात, अशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. त्यानुसार मनपा आणि पोलिसांनी मिळून संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वी घेतला होता. मंगळवारी सकाळी अचानक कारवाईला सुरुवात झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा, कर्मचारी, तसेच पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त सोबत ठेवण्यात आला होता.
दहा शैक्षणिक संस्थांचा परिसरएमजीएम रुग्णालयाच्या आसपास असलेल्या पानटपऱ्यांची पूर्णपणे मोडतोड करण्यात आली. या भागातील हातगाड्याही जप्त केल्या. एखाद्या इमारतीत पानटपरी सुरू असेल तर तेथेही कारवाई केली. स.भु. महाविद्यालयाच्या आसपासही अशीच कारवाई केली. एमआयटी परिसरात कमी दुकाने होती. मौलाना आझाद, देवगिरी महाविद्यालयासमोर मोठी कारवाई केली. विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात चहाच्या टपऱ्या, हातगाड्या अधिक होत्या. बळीराम पाटील विद्यालय, कोकणवाडी भागातील तीन कोचिंग क्लासेसच्या परिसरातही मोठी कारवाई केली.
पाच टेम्पो जप्तदेवगिरी महाविद्यालय रोडवर अनेक वर्षांपासूनच पाच टेम्पो पडून होते. अतिक्रमण हटाव विभागाने या टेम्पोंचा चेंदामेंदा करून साहित्य जप्त केले. यापुढे रस्त्यावरील भंगार वाहनांचा अशाच पद्धतीने चेंदामेंदा केला जाणार आहे.
१०९ व्यापाऱ्यांवर कारवाईमहापालिका आणि पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात ४७ पानटपऱ्या, ४५ शेड-हॉटेल, १८ हातगाड्या, अशा एकूण १०९ व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यानंतर सिडको-हडको, बीड बायपास आदी भागांत कारवाई केली जाणार आहे.