छत्रपती संभाजीनगर: शांततेत पार पडलेल्या हिंदू गर्जना मोर्चातील काही तरूणांनी ॲक्सिस बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकावर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना रविवारी दुपारी स.भु.कॉलेज बसस्थांब्यासमोर घडली. ही बाब समजताच पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेताच दगडफेक करणारे तरूणांचे टोळकं तेथून पळून गेले. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला.
शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाच्या समर्थनात आणि केंद्रसरकार, राज्यसरकारचे अभिनंदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्यावतीने रविवारी शहरात हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन केले होते. कडक पोलीस बंदोबस्त क्रांतीचौकातून निघालेला हा मोर्चा अदालत रोडवरून आय.एम. हॉल, विवेकांनद कॉलेजसमोरून समर्थनगर मार्गे निरालाबाजारमधून औरंगपुऱ्यात पोहचला.
अत्यंत शांततेत पार पडलेल्या या मोर्चाच्या समारोपानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती. मोर्चात सहभागी नागरीक आपआपल्या घरी जाईपर्यंत पोलिसांनी बंदोबस्तावर कायम राहण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिलेल्या होत्या. मोर्चाच्या मार्गावरील स.भु्. कॉलेजसमोरील ॲक्सिस बँकेच्या नामफलकात औरंगाबाद कायम होते.
यामुळे तरूणांच्या एका टोळक्याने या बँकेवर अचानक दगडफेक केल्याने बँकेच्या दोन काचा फुटल्या. यातील एक दगड सुरक्षारक्षक विशाल गोंडाने यांना लागल्याने त्यांना मुका मार लागला. तसेच या बँकेशेजारील चाटे कोचिंग क्लासेसचा फलकाची तोडफोड केली. याच रस्त्यावर महापालिकेचे महिला शौचालय आहे. या शौचालयाच्या नामफलकात औरंगाबाद नाव असल्याचे पाहुन तरूणांनी अन्य काही दुकानांच्या फलकाची फलकाची तोडफोड केली.
पोलीस आयुक्तांसह उपायुक्त धावलेही घटना कळताच पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दगडफेक करणारे घोळक्यात मिसळून निघून गेले. यानंतर
तरूण फलकाची तोडफोड करीत होते अन...पोलीस पहातच राहिले
छत्रपती संभाजीनगर शहरातील हिंदू गर्जना मोर्चात गडबड होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही मोठी खबरदारी घेण्यात आली होती. विविध चौकात आणि मोर्चाच्या मार्गावर चोख बंदोबस्त तैनात होता. असे असताना स.भु.कॉलेजसमोरील मनपाच्या महिला शौचालयावर चढून काही तरूणांनी औरंगाबाद नावाचा फलक तोडून फेकला. तरूणांचे हे कृत्य तेथे तैनात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी पहात राहिल्याची चर्चाही घटनास्थळी ऐकायला मिळाली.