छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांत्तर करण्यात आले. या नामांत्तराच्या समर्थनार्थ सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने आज(रविवार) विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीदेखील हजारोच्या संख्येने लोक क्रांती चौकात गोळा झाले आणि यावेळी मोठी रॅलीदेखील निघाली. यावेळी विविध पक्षाचे नेतेही उपस्थित होते.
हजारोच्या संख्येने लोक एकत्र
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाचा हिंदू समाजाच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी आणि छत्रपती संभाजी नगर नावाच्या समर्थनार्थ आज सकल हिंदू एकत्रित समितीच्या वतीने क्रांती चौक इथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हजारोच्या संख्येने सकल हिंदू समाज एकवटला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या.
जागोजागी पोलीस बॅरिकेट
क्रांती चौक-पैठण गेट या मार्गा ऐवजी हा हिंदू गर्जना मोर्चा क्रांती चौक सतीश मोटर्स विवेकानंद कॉलेज समोर निराळा बाजार मार्गे निघाला. मोर्चा इतका मोठा आहे की, याचे एक टोक औरंगपुऱ्यात तर शेवटचे टोक अजूनही जालना रोडवर आहे. यावेळी औरंगपुरा परिसरात या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट लावून रस्ते बंद केल्याने वाहन चालक अडकून पडले आहेत.
परवानगी नसतानाही मोर्चा
मोर्चासाठी परवानगी मिळण्यासाठी संयोजकांनी 16 मार्च रोजी पोलीस प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र आयोजकांना दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी ठरल्याप्रमाणे मोर्चा काढला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते.