छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रोची घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २४ एप्रिल २०२२ केली होती. यासाठी महापालिका स्मार्ट सिटीने डीपीआरदेखील तयार केला; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआयने) याबाबत हात वर केले असून, असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे मध्यंतरी पालिका स्मार्ट सिटी कार्यालयाला कळविले आहे. उड्डाणपूल आणि मेट्रोच्या घोषणेसह छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन व विद्ममान रस्त्यासह उड्डाणपूल बांधण्याची घोषणा ही घोषणाच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलीकडच्या काही वर्षांत छत्रपती संभाजीनगर ते फर्दापूर हा रस्ता बांधला. परंतु, त्याचेही २० टक्के काम बाकी आहे. संभाजीनगर ते पैठण या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या दोन प्रकल्पांसह सोलापूर-धुळे महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम झाले.
औट्रमचा बोगदादेखील झाला नाही....यूपीए सरकारच्या काळात सोलापूर- धुळे महामार्गाचे काम सुरू झाले. त्यात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. विद्यमान सरकारच्या काळात सहा कोटींवर बोगद्याचे काम गेले. परंतु, ते काम झाले नाही. पर्यायी मार्ग शोधण्यासाठी दोन वर्षांपासून काम सुरू आहे. सध्या औट्रम घाट जड वाहतुकीसाठी बंद आहे.
एनएचएआयचा असा आहे दावा....२०१४ मध्ये जिल्ह्यात १४५ कि.मी. राष्ट्रीय महामार्ग होते. त्यानंतर ४५० कि.मी. नवीन महामार्ग जिल्ह्यात दिले. सध्या ५९५ कि.मी. महामार्ग जिल्ह्यात आहेत. नऊ वर्षांत चार हजार ४२२ कोटींच्या १३ पैकी ५ कामे पूर्ण झाली असून, ८ बाकी आहेत. २२५३ कोटींची चार कामे प्रस्तावित होती. सीआरएफमधून ४०० कोटींची ३० कामे पूर्ण केल्याचा दावा एनएचएआयने मागे केला होता.
मेट्रो व उड्डाणपुलाची गडकरींची अशी होता घोषणा.....शेंद्रा एमआयडीसी ते वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल म्हणजे खाली रस्ता, वर पूल व मेट्रो असा प्रस्ताव तयार केला जाईल. हा प्रकल्प २५ कि.मी.चा असेल. यात १६ कि.मी. चौपदरी उड्डाणपूल आणि नऊ कि.मी.च्या डबलडेकर पुलासह हा सहा हजार कोटींचा संयुक्त प्रकल्प असेल. शेंद्रा एमआयडीसी ते चिकलठाणा या चौपदरी उड्डाणपुलाची लांबी साडेसात कि.मी.असून, आठ पदरी हा रस्ता असेल. चिकलठाणा ते क्रांती चौकापर्यंत ८.५ कि.मी. अंतर्गत डबलडेकर उड्डाणपूल असेल. त्याखाली चौपदरीकरणात मेट्रो असेल. क्रांती चौक ते वाळूज एमआयडीसीपर्यंत नऊ कि.मी.चा चौपदरी पूल व रस्ता खाली असेल. शेंद्रा ते वाळूज २५ कि.मी. रेल्वेपूल ३० ते ४५ मीटरचा असेल. रेल्वेपूल असेल तेथे खाली आठ पदरी रस्ता व चौपदरी रस्ता असेल. ३० मीटरच्या पुलाखाली चौपदरी रस्ता व पूल असेल. चार हजार कोटींचा खर्च या पुलासाठी लागेल. चिकलठाणा ते क्रांतीचौक असा १२ कि.मी. मार्ग असेल. या अंतरात नऊ कि.मी. डबलडेकरचा उड्डाणपूल असेल. दुसरा मार्ग हर्सूल ते सिडको बसस्थानकापर्यंत १३ कि.मी. मार्ग असेल. अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री गडकरी यांनी एप्रिल २०२२ मध्ये केली होती.
विद्यमान पुणे रस्त्याचे काय....छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा विद्यमान रस्ता एक्स्प्रेस-वेमध्ये करण्याची २०२१ मध्ये घोषणा झाली. परंतु, या रस्त्याच्या कामाला राजकीय ब्रेक लागल्याची चर्चा आहे. एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआय तिन्ही संस्था एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. राजकीय इच्छाशक्तीअभावी या रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळत नसून आजवर फक्त कागदोपत्रीच या रस्त्याचे काम पुढे सरकले आहे.
दोन तासांत पुण्याला जाण्यासाठी घोषणा....छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे अंतर सुमारे दोन तासांत पूर्ण करण्यासाठी नवीन (एक्स्प्रेस-वे) द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने करण्याच्या घोषणेला १८ महिने झाले आहेत. १० महिन्यांपूर्वी या मार्गासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. पुढे केंद्र शासनाच्या कॅबिनेटपर्यंतही हा प्रस्ताव अद्याप पोहोचलेला नाही.