छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील कारभार म्हणजे आंधळं दळतंय...अशी दशा आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी दुपारी अचानक शिक्षण विभागात स्टिंग ऑपरेशन केले. कार्यालयातील लिपिकांना संगणकावर बसवून टायपिंग करण्याचे आदेश दिले. यामध्ये एकाही लिपिकाला टंकलेखन आले नाही. ४५ हजार रुपये पगार घेणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना टायपिंग येत नसल्याने त्यांना धक्काच बसला. याच विभागात ९ हजार रुपयांवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला टंकलेखन आले. त्यामुळे महिनाभरात सर्व लिपिकांची परीक्षा घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी मनपा मुख्यालयातील सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे कामाची पाहणी केली. सभागृहाला कुलूप असल्याने त्यांनी विविध विभागात फेरफटका मारला. डीपी युनिट पासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ते विधि सल्लागार, आस्थापना, एनयूएलएम, कामगार व शेवटी शिक्षण विभागात पाहणी केली. शिक्षण विभागात काही महिला कर्मचारी बसलेल्या दिसल्या. त्यांनी यातील लिपिक कोण, अशी विचारणा केली. तीन महिलांनी आम्ही लिपिक असल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत एक कंत्राटी महिला कर्मचारी होती. जी. श्रीकांत यांनी महिला कर्मचाऱ्यांना ‘टायपिंग करून दाखवा’ असे सांगितले. एका महिलेने मी खूप घाबरले आहे, असे कारण दिले. दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याने मी टायपिंग शिकत आहे, असे उत्तर दिले. एका महिला कर्मचाऱ्याने मात्र टायपिंग करून दाखविली. त्यावर ज्या कर्मचाऱ्यांना टायपिंग येत नव्हती त्यांना उद्देशून जी. श्रीकांत यांनी तुम्हाला वेतन किती मिळते, अशी विचारणा केली. महिला कर्मचाऱ्याने ४५ हजारांचा आकडा सांगितला. टायपिंग येत नसेल तर तुम्हाला एवढा पगार कशासाठी द्यायचा, असा प्रश्न त्यांनी केला.
कंत्राटी कर्मचाऱ्याला जास्त कामकंत्राटी कर्मचाऱ्याला जी. श्रीकांत यांनी वेतन विचारले असता, त्याने ९ हजार ५०० रुपये मिळतात, असे सांगितले. अनेक विभागात कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच जास्तीचे काम असल्याचे चित्र आहे. वेतन मात्र कायम कर्मचाऱ्याचे चार ते पाच पटीने जास्त आहे.