छत्रपती संभाजीनगर : नापास झाल्यानंतर मुले नाउमेद हाेतात. त्यातून चुकीचा मार्ग निवडतात. मात्र, १२ वीत नापास झाले म्हणजे सर्व काही संपले, असे नसते. सक्सेस होण्यासाठी केवळ टक्केच कामी येत नाहीत, प्रयत्न केल्यानंतर पुन्हा उंच भरारी घेता येते. हे दाखवून देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बारावीत नापास, कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जंगी 'फेल्युअर पार्टी'चे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांना सहभागी होत धम्माल केली. या अजब कार्यक्रमाची गजब चर्चाच राज्यभरात सुरू झाली आहे.
महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी सिडकोतील स्मार्ट सिटी लाईट हाऊस स्किल डेव्हलपमेंट केंद्रात मंगळवारी आगळ्या वेगळ्या अशा 'फेल्युअर पार्टी' चे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये १२ वीत नापास झालेल्या, कमी गुण मिळालेल्या ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि भविष्याची दिशा मिळण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. सीआयएसएफचे कमांडर पवन कुमार, आरजे अर्चना गायकवाड, सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर मुदसीर, अब्दुल्लाह आदींनी मार्गदर्शन केले. मनपा प्रशासक म्हणाले, मी स्वत: शेतकरी कुटुंबातील आहे. ११ वी मध्ये नापास झाल्यानंतर कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला. १२ वी नंतर रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी लागली. नोकरी करतानाच जिल्हाधिकारी व्हायचे म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. सुरुवातीला अपयश आले. तेव्हा अनेकांनी उपहासात्मक टीका केली. तेव्हा पुन्हा हिंमतीने प्रयत्न केला. त्यानंतर यश मिळाले. हे जर मी करू शकतो, तर तुम्ही का नाही, असा सवालही त्यांनी या विद्यार्थ्यांना केला. मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्व मुलांनी एकत्र येत गाण्यांवर जोरदार नृत्य करीत धम्माल उडवून दिली.
कोणाला उद्योजक तर कोणाला इंजिनिअर व्हायचेययावेळी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. ४४ टक्के घेतलेला सलमान अली याने आपल्याला सॉफ्टवेअर कोडिंग करायची असल्याचे सांगितले. एका नापास विद्यार्थ्याने स्टील व्यावसायिक बनण्याची इच्छा व्यक्त केली. कमी टक्के मिळाल्यामुळे निराश होतो, पण आता बरं वाटत असल्याचेही एका विद्यार्थ्याने सांगितले.