छत्रपती संभाजीनगर : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी महापालिका-स्मार्ट सिटीने गुरू ॲप सुरू केले. ॲपमुळे आतापर्यंत १३०० विद्यार्थी शाळेत परत आले. ७२ शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचली. यासाठी सावित्रीबाई एज्युकेशन कंट्रोलरूम स्थापन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाची दखल घेतली. राज्यातील जिल्हा परिषद, मनपा, आश्रमशाळा, वस्तीशाळांमध्ये ही संकल्पना राबविण्यासाठी पुणे येथे शिक्षण आयुक्तांसमोर बुधवारी गुरू ॲपचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महापालिकेच्या शाळा, विद्यार्थी यांच्याकडे प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी कधीच लक्ष दिले नाही. आस्तिककुमार पाण्डेय मनपा प्रशासक असताना त्यांनी ५० मनपा शाळा डिजिटल केल्या. प्रशासक जी. श्रीकांत यांनीही शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले. सर्वप्रथम गुरू ॲप तयार केले. या माध्यमातून दररोज विद्यार्थी, शिक्षकांची हजेरी घेतली जात आहे, एकत्रित डेटा संकलित करण्यासाठी मजनूहिल येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या इमारतीमध्ये कंट्रोलरूम सुरू करण्यात आली. सलग तीन दिवस, सात दिवस गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ॲपवर उपलब्ध होते. विद्यार्थी गैरहजर असतील त्यांच्या पालकांना मोबाइलवरून माहिती कळविण्यात येते. कंट्रोलरूममधून आतापर्यंत ४ हजार ३०० कॉल पालकांना करण्यात आले. त्यातून नेहमी गैरहजर राहणाऱ्या १३०० विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात यश मिळाले असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
राज्यभर छत्रपती संभाजीनगर पॅटर्नउपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त स्मार्ट सिटीत आले. त्यांनी या उपक्रमाची माहिती जी. श्रीकांत यांच्याकडून घेतली. त्यांना ही संकल्पना खूप आवडली. राज्यभरात ही संकल्पना राबविण्यासाठी किती खर्च येईल, अशी विचारणा केली. २ हजार कोटी रुपये लागतील असे सांगण्यात आले. ॲप तयार करणारे विद्यार्थी आयआयएम बंगळुरू येथील आहेत. पुणे, संभाजीनगर, बीड येथील हे विद्यार्थी आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी बुधवारी शिक्षण आयुक्तांसमोर सादरीकरण केले.