औरंगाबाद: केवळ श्रेय मिळविण्यासाठी शिवसेना प्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या 'संभाजीनगर' नामकरणाच्या निर्णयाला शिंदे- फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानेच शिंदे- फडणवीस यांनी दोन दिवसांमध्ये पुन्हा नामकरणाचा निर्णय घेतला. मात्र, शहराचे 'छत्रपती संभाजीनगर' नामकरणाचे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे आहे, अशी दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयास राज्य सरकारने शुक्रवारी स्थगिती दिली. त्यानंतर आज पुन्हा कॅबिनेट बैठक शिंदे सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर केले आहे. यावर शिवसेना नेते खैरे म्हणाले की, औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामांतर व्हावे, अशी अनेक वर्षांपासून शिवसेनेची मागणी होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या सहमतीने नामांतराचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन्ही शहराचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांना जात आहे. हे श्रेय त्यांना जाऊ नये, म्हणून राज्यसरकारने या निर्णयास स्थगिती दिल्याचा आरोप खैरेंनी केला. तसेच आता महिन्याभरात केंद्र सरकारकडून यास मंजुरी मिळावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील खैरे यांनी यावेळी दिला.
जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले की, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख यांनी घेतल्याने याचे सर्व श्रेय त्यांना जात आहे. यामुळे काही लोकांचा पोटशूळ उठला आहे. शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी त्यांच्या या निर्णयास स्थगिती देण्यात आली होती. शहर नामकरणाचे संपूर्ण श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याचेच आहे.
तत्पूर्वी, आज सकाळी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने राज्यसरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी टी व्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेने निदर्शने केली. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास स्थगिती देणाऱ्या राज्यसरकारचा निषेध असो, जय भवानी ,जय शिवराय च्या घोषणा देत शेकडो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे,माजी महापौर नंदू घोडेले, पूर्व शहर संघटक राजू वैद्य, अनिल पोलकर, बाळासाहेब थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी , महिला आघाडी सहभागी झाली