छत्रपती संभाजीनगर: धावत्या कारने पेट घेतल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशाच प्रकारची घटना शहरात घडली आहे. नांदेडवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्राला भेटण्यासाठी येताना चालत्या ऑडी कारने पेट घेतला. सोमवारी रात्री ९ वाजता धुत रुग्णालय ते विठ्ठलनगर दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य जगन्नाथ कोंडवार (रा. नांदेड) हे मित्रासह त्यांच्या ऑडी क्यू ३ कारने (एम एच ११ - बीव्ही - ५१७९) शहरात येत होते. विमानतळापासून त्यांच्या कारच्या इंजिनमधून अचानक धूर निघण्यास सुरूवात झाली. विठ्ठलनगरमधील सह्याद्री रुग्णालयाच्या समोर कोंडवार यांनी कार थांबवून बाहेर निघाले.
काही क्षणात कारने पेट घेतला. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने कोंडवार यांनी तत्काळ कारमधील सर्व साहित्य बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन अधिकारी सोमिनाथ भोसले, अग्निशामक दीपक लव्हाळे, राजू राठोड, लालचंद दुबिले, विनोद तुपे यांनी धाव घेत आग विझवली. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. सदर कार २०१५ ची असून कोंडवार हे तिचे सेकंड ओनर आहेत.