छत्रपती संभाजीनगर : जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजार समिती आहे. याअंतर्गत करमाड व पिंप्रीराजा येथे उपबाजारपेठ आहेच शिवाय आता लाडसावंगी व माळीवाडा अशा आणखी दोन उपबाजारपेठा उभारण्यात येणार आहेत. या ४ उपबाजारपेठांचा तालुक्यातील २०१ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आता गरज भासणार नाही.
शेतीमालाचा योग्य भाव शेतकऱ्यांना मिळावा, त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. १९९८ मध्ये जाधववाडीत २०९ एकरवर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे भव्य संकुल उभारण्यात आले. करमाड उपबाजारपेठेची ८ एकर जागा होती. तिथे बाजार संकुल उभारले आहे. तिथेही शेतीमालाची मोठी आवक होत आहे. पिंप्रीराजा येथील ६ एकर जमीन बाजार समितीने पूर्वीच घेतली असून तिथे कै. सखाराम पाटील पवार यांच्या नावाने उपबाजारपेठ उभारण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. याशिवाय विद्यमान संचालक मंडळांनी आणखी दोन उपबाजारपेठ उभारण्याचा विडा उचलला आहे.
लाडसावंगी व माळीवाडा येथे प्रत्येकी १० एकर जागा खरेदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पिंप्रीराजा येथे मोसंबीसह अन्य शेतमालाचे आडत मार्केट होणार आहे. तर, समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या लाडसावंगी येथे टोमॅटो, मोसंबी, डाळींब, भाजीपाला व भुसार मालाचे आडत बाजार व तिथेच प्रोसिसिंग युनिट उभारले जाणार आहे. जेणेकरून तिथून माल समृद्धी महामार्गाद्वारे मुंबई-नागपूरपर्यंत लवकर पोहोचविला जाईल. यामुळे तालुक्यातीलच २०१ गावांतील शेतकऱ्यांना आपल्या गावाजवळील उपबाजारपेठेत जाऊन शेतीमाल विकता येणार आहे. मालवाहतूक भाड्यातही मोठी बचत होणार आहे. तसेच स्पर्धा निर्माण झाल्याने शेतीमालास चांगला भाव मिळणार आहे.
जागा खरेदीसाठी शोध मोहीम वर्षभरात उभारणार उपबाजारपेठ पिंप्रीराजा येथे उपबाजारपेठ, सेल हॉल, आडत्यांसाठी गाळे, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी शासनाची मंजुरी मिळत आहे. येथील काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, लाडसावंगी व माळीवाडा परिसरात उपबाजारपेठ व प्रोसिसिंग युनिट उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो पणन संचालकांना पाठविण्यात येत आहे. जागा खरेदीसाठी शोध मोहीम सुरू झाली आहे. आ. हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपबाजारपेठ वर्षभरात उभारली जाईल.-राधाकिसन पठाडे, सभापती, उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
जळगाव रोडवर कृउबाचे भव्य प्रवेशद्वारजाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळगाव रोडवर प्रवेशद्वार नव्हते. मात्र, आता ३० मीटर रुंद व ७.५ मीटर उंचीचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. जानेवारीत या कामाला सुरुवात होत आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची मागणी आता यानिमित्ताने पूर्ण होत आहे.