छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत असून, गुरुवारी यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ४१.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. आगामी दोन दिवसांत तापमानाचा पारा ४२ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शहरात सोमवारपासून तापमानाचा पारा वाढायला सुरुवात झाली. सोमवारी म्हणजे ८ मे रोजी शहरात ३८.० इतके कमाल तापमान होते. अवघ्या चारच दिवसांत तापमाना पारा ४१ अंशांवर गेला आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाच्या चटक्यांबरोबर गरम वारेही वाहत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही नागरिकांना अवघड होत आहे. शहरात बुधवारी ४०.२ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. एकाच दिवसात, गुरुवारी त्यात १.२ अंशाने वाढ झाली आणि ४१.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.
उष्माघातापासून करा बचावप्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरीरातील उष्णता संतुलन बिघडते आणि उष्माघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक असते. तेव्हा शक्यतो उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यकच असल्यास टोपी, रुमाल वापरावा. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
आगामी पाच दिवसांतील तापमानाचा अंदाज (अंश सेल्सिअस)तारीख- कमाल- किमान१२ मे-४१.० - २७.०१३ मे-४२.०-२६.०१४ मे - ४१.०- २५.०१५ मे- ४०.०-२४.०१६ मे-३९.०-२४.०