छत्रपती संभाजीनगर : भारतीय रेल्वेने रुळांचे वजन वाढवून लोहमार्गाचे मजबुतीकरण सुरू केले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातही काम युद्धपातळीवर असून, छत्रपती संभाजीनगरमध्येही हे काम आता ‘फास्ट ट्रॅक’वर आले आहे. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी जागोजागी नवे रूळ ठेवण्यात आले आहे. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सांभाळून टप्प्याटप्प्याने हे रूळ बदलण्याचे काम केले जात आहे.
भारतीय रेल्वेकडून रेल्वेगाड्यांची गती वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. यात अधिक वजनाचे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि पुलांचे मजबुतीकरण आदींचा समावेश आहे. यात सध्या रेल्वे रूळ बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. अधिक वजनाच्या रुळाखालील खडी, सिमेंटचे स्लीपर निघाले, तरी हे रूळ वाकणार नाहीत. त्यामुळे रेल्वेगाडी अधिक वेगाने धावणार आहे. याबरोबरच दोन रूळ जोडताना निर्माण होणारे अंतराची स्थिती नष्ट करण्यासाठी रुळांची लांबीदेखील वाढविण्यात येत आहे.
हा होईल फायदा?रेल्वे गाड्यांची गती सध्या ११० किमी प्रतितास आहे. ही गती १६० किमी प्रतितास करण्यासाठी रूळ अधिक वजनाचे वापरण्यात येत आहे. त्यासाठी सध्याचे रूळ आणि त्याखालील स्लीपरला बदलण्यात येत आहेत. सध्या जे रूळ आहेत, त्यांचे वजन ५२ किलो प्रतिमीटर आहे. त्याऐवजी आता ६० किलो प्रतिमीटर वजनाचे रूळ टाकण्यात येत आहेत.
राजनगर रेल्वेगेटवर देखभाल-दुरुस्तीस प्रारंभदेखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी राजनगर येथील रेल्वे गेट (क्र. ५६) येथे सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून देखभाल-दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. या कामासाठी हे रेल्वेगेट १७ जुलैला सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हे रेल्वेगेट बंद राहिल्याने चिकलठाण्यातील जुन्या बीड बायपासवरील भुयारी मार्ग आणि केम्ब्रिज ते झाल्टा फाटा मार्गे वाहनांना ये-जा करावी लागणार आहे. मात्र, पहिल्या दिवशी दुपारपर्यंत रेल्वेगेटचा मार्ग अर्धा खुला होता. त्यामुळे या ठिकाणाहून वाहनांची ये-जा सुरू होती. पहिल्या दिवशी रेल्वेगेटच्या रुळाखालील खडी हटविण्याचे काम करण्यात आले.