छत्रपती संभाजीनगर : हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) झालेली गावे मॉडेल करण्यासाठी जिल्हा परिषदेने विडा उचलला असून, गावातील परिसर व घरातील ओला-सुका कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी आता जिल्ह्यात ८ जुलै ते ७ ऑगस्ट या महिनाभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सोमवारपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ही विशेष मोहीम महिनाभरात यशस्वी करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘स्वच्छतेचे दोन रंग : ओला हिरवा, सुका निळा’ या नावाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत राज्य हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावांत दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे, यासाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृहभेटी देऊन जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ५ संवादकांची निवड करण्यात आली असून, हे संवादक घरोघरी जाऊन संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.
ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात आणि सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवावा. नियमितपणे शौचालयाचा वापर करावा, शास्त्रयुक्त पद्धतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व्हावे, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैलागाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर यासंदर्भात गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहे. भेटीदरम्यान शासनाच्या गुगल लिंकद्वारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्यात येणार आहे. तालुक्यातील गावांतील पाच कुटुंबामागे एक ‘संवादक’ तयार करून गटविकास अधिकाऱ्यांनी गृहभेटीचे नियोजन करावे, यासाठी तालुक्यातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी यांना संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. दर आठवड्याला या अभियानाचा जिल्हास्तरावरून आढावा घेण्यात येणार आहे.