मध्यंतरीच्या काळात म्हणजे २०१७ यावर्षी पर्यटनासाठी दुबईला जाण्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील ‘गोल्ड सौक’ हे मार्केट पाहण्यास मिळाले. ही साधी पण ग्राहक, पर्यटकांना आकर्षित करणारी मांडणी आपण आपल्या शहरात सराफा बाजार रोड किंवा कासारी बाजारातही राबवू शकतो, असा विचार तेव्हा मनात डोकावला. त्यानुसार मी आर्किटेक्ट करण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती आर्किटेक्ट स्वप्नील पारगावकर यांनी दिली.
आर्किटेक्ट असल्याने कोणत्याही देशात गेले तर तेथील शहरी भाग, ग्रामीण भाग, तेथील इमारती, तेथील बाजारपेठ पाहणे, वैशिष्ट्य जाणून घेणे आणि त्याचा अवलंब आपल्या शहरात करता येतो का? याची चाचपाणी करणे हे रक्तातच भिनलेले आहे. तसे दुबई येथील समुद्र, खनिज तेल आणि वाळवंट वगळता अन्य सर्व मानव निर्मित आहेत. साधारणत : मागील ५० ते ६० च्या दशकात त्यांनी नवनिर्माणावर भर दिला आणि पर्यटकांना, व्यावसायिकांना आकर्षित करुन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे व्यापारपेठा विकसित झाल्या. यामुळे पर्यटकांना हव्या असलेल्या वस्तू व त्या आधारित अनेक व्यवसाय निर्माण झाले.
दुबईत अनेक गोष्टी पाहिल्या. त्यापैकी एक सोपी आणि अनुकरणीय जागा लक्षात राहिली ती म्हणजे ‘डेरा’ येथील गोल्ड सौक (GOLD SOUK) म्हणजेच सोन्याचे मार्केट. अत्यंत साधी मांडणी, ग्राहकांना फिरण्यास सोयीस्कर व व्यावसायिकांना फायदेशीर आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली सुनियोजित सोने - चांदीच्या दागिन्यांचे शोरुम रस्त्यावर साधे कौलारु छत, तेथे बसण्यासाठी बाक आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर एकही वाहन धावत नाही. फक्त पादचाऱ्यांसाठीचा हा रस्ता, छोटेखानी आइस्क्रीम व खाद्यपदार्थांची टपरीवजा दुकानं, रस्त्याची रुंदी सुमारे ४० फूट लांबी असेल. साधारण ३०० मीटर त्यावर असलेली दुकाने आपले लक्ष सहज वेधून घेतात. त्यात भारतीय व्यापाऱ्यांची बरीच दुकानंदेखील आहेत. काही ‘मराठी’ बोलणारे त्यांचे सेल्समनही मी पाहिले आहेत.
हे बघताना मला वाटले की, अशी बाजारपेठ आपल्या संभाजीनगरात पण आहेच की, ‘सराफा मार्केट’, त्याचीही रचना अशीच आहे. रस्त्याची रुंदी पण तितकीच. आपल्याकडेही प्रशासनाने या दुबई ‘गोल्ड सौक’सारखे नियम केले, या रस्त्याला वरुन छत्र बसवले व्यवसायाच्या वेळेत वाहनाला बंदी घातली, वृद्धांना फिरायला इलेक्ट्रिक कार्ट आदी, सोयीसुविधा केल्या तर आपलेही ‘सराफा मार्केट’ असो वा ‘कासारी बाजार’ एक आदर्श मार्केट होऊ शकते. यामुळे येथील व्यावसायिकांना त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. येणाऱ्या ग्राहकांना सुविधा मिळतील. पार्किंगची समस्या, रस्त्यावरील अतिक्रमण यास कंटाळून शहराबाहेर शोरुम टाकणारे ज्वेलर्स पुन्हा एकदा या मध्यवर्ती बाजारपेठेत येतील. कारण, या व्यवसायात बरीच उलाढाल आणि रोजगार अवलंबून आहे. माझ्या दृष्टीने प्रशासनाने याकडे यास लक्ष देऊन या भागाचा दूरदृष्टीने विकास करावा.