छत्रपती संभाजीनगर : अलिकडे गावोगावी खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकतील का, अशी भीती अनेकांना वाटायची. पण, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाडीवाट येथील जि. प. शाळेने आपल्या शैक्षणिक प्रगतीद्वारे खासगी शाळांना धडकी भरवली असून, सद्यस्थितीत या शाळेमध्ये इयत्ता १ली ते ८वीपर्यंत ७०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांना बसण्यासाठी आता जागा अपुरी पडत असल्यामुळे शाळेला प्रवेश बंद करावे लागले, हे विशेष!
शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे पंचक्रोशीत शाळा आणि तेथील शिक्षकांची चर्चा आहे. पालकांमध्ये समाधान आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली आहे. शिक्षण विभागाकडूनही या शाळेचे कौतुक होत आहे. या शाळेचा शैक्षणिक आलेख दिवसेंदिवस वर सरकत असल्यामुळे यंदापासून येथे हायस्कूलसाठी मान्यता मिळाली आहे. यंदा येथे ९वीचा वर्ग सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात तालुक्यासाठी दुसरे बक्षीस या शाळेने पटकावले आहे.
आठवीपर्यंतचे सर्व प्रवेश फुल्लशाळेत १ली ते ८वीपर्यंत प्राथमिक शाळेचे वर्ग चालतात. ७००हून अधिक प्रवेश झाल्यामुळे शाळेला आता नाइलाजाने प्रवेश बंद करावा लागला आहे.
शाळेतील या उपक्रमांचे कौतुकसंगणक लॅब : शाळेत असलेल्या संगणक लॅबमध्ये मुले रोबोटिक्स, गेम आणि विविध कोडिंग प्रशिक्षकाविना स्वत:च ‘यूट्यूबवर बघून विकसित करीत आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी : शाळेचा वेळ नियमानुसार ९:३० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत आहे. पण, ही शाळा पहाटे ६:०० वाजताच उघडते. शिक्षकही पहाटेच शाळेत येतात. इथे खेळ आणि स्पर्धा परीक्षेची मुलांकडून तयारी करून घेतली जाते.
जपानी भाषा : शाळेतील मुलांना जपानी भाषा शिकवली जाते. अनेक मुले सहजपणे जपानी भाषा लिहू शकतात व बोलूही शकतात.
रिड गाडीवाट : संध्याकाळी ७:०० ते ८:०० वाजेपर्यंत शाळेची मुले आपल्या ओट्यावर बसून लोकांना ऐकू जाईल, अशा मोठ्या आवाजात वाचन करतात. वर्तमानपत्र, गोष्टीचे पुस्तक, अभ्यासक्रमाचा धडा, असे काहीही वाचता येईल. वाचनासाठी अमुक एक पुस्तकच वाचावे, असे बंधन नाही.
शाळेचे वेगळेपण काय?या शाळेचे विद्यार्थी प्रशिक्षकाविना ‘यूट्यूब’वर बघून स्वत:च रोबोटिक्सचे कोडिंग विकसित करत आहेत. वेगवेगळे ‘गेम’ विकसित केले आहेत. या शाळेत मुलांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. त्यांना जापानीज भाषा शिकवली जात आहे. ही संपूर्ण शाळा सोलार एनर्जीवर चालते. या शाळेने अनेक बक्षिसेही पटकावली आहेत.
शालेय शिक्षणाबरोबरच ‘आयटी’चे ज्ञानपालक सहभागातून ही शाळा आदर्श शाळा झालेली आहे. शाळा सकाळी ६:०० वाजता भरते. पण, सायंकाळी शाळा सुटण्याची निश्चित वेळ नाही. ती वेळ विद्यार्थीच ठरवतात. शालेय शिक्षणाबरोबरच रोबोटिक्स, गेम आदी ‘आयटी’चे विषय शिकवले जातात.- अनिल दशरथ शिंदे, उपसरपंच
शिक्षकांसोबत पालकांचाही सहभागगाडीवाटच्या शाळेत नियमित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालवले जातात. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून खूप विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत आहेत. शिक्षकांसोबत पालकही गुणवत्तेच्या कामात सहभागी आहेत.- साईनाथ राठोड, पोलिसपाटील,
शाळा कधी सुटणार हे विद्यार्थी ठरवतात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना घडविण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी तन- मन- धनाने स्वत:ला झोकून दिले आहे. शालेय शिक्षणाबरोबर त्यांच्या स्पर्धा परीक्षांची त्यांच्यात गोडी निर्माण करणे, एवढेच नाही, तर त्यात हमखास यश मिळण्यासाठी आम्ही सारेजण प्रयत्न करीत आहोत. आम्ही घड्याळी तासांवर शाळा चालवत नाहीत. पहाटे ६:०० वाजता शाळा सुरू होते. ती कधी सुटेल, त्याची मात्र, नक्की वेळ नसते.- दादासाहेब नवपुते, प्राथमिक शिक्षक