फुलंब्री: तालुक्यातील पाल हे मुळगाव असलेली कल्पना धनायत रेल्वेच्यावंदे भारत एक्सप्रेसमध्ये सहाय्यक लोको पायलट म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे, शनिवारी धावणाऱ्या मराठवाड्यातील पहिल्या जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य कल्पना करणार आहे. स्वतःच्या शहरात लोको पायलट म्हणून सारथ्य करत येणाऱ्या कल्पनाचे कौतुक होत आहे.
मदनसिंग धनायत हे मुळचे तालुक्यातील पाल येथील रहिवासी. पाल येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षणानंतर एसटी महामंडळात नौकरी लागल्याने धनायत छत्रपती संभाजीनगर शहरात राहण्यास गेले. ते एसटी महामंडळात तिकीट तपासनीस होते. मुलगी कल्पना हिने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअर अँड पॉवर ही पदवी २०१६ मध्ये मिळविली. त्यानंतर २०१९ मध्ये रेल्वे विभागात तिची लोको पायलट म्हणून निवड झाली. दरम्यान, मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची गुरुवारी छत्रपती संभाजीनगर ते मनमाड यशस्वी चाचणी पार पडली. शनिवारी उद्घाटनानंतर जालना ते छत्रपती संभाजीनगरमार्गे मनमाडपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. यावेळी कल्पना या रेल्वेचे सारथ्य करणार आहे.
आनंद गगनात मावेना कल्पना शिक्षणात अत्यंत हुशार आहे. दहावीला ९५ टक्के गुण मिळवले तेव्हाच वाटले होते मुलगी नाव काढेल. आता लोको पायलट होऊन ती शहरात आल्याने आमचा आनंद गगनात मावेना झाला आहे, अशी प्रतिक्रिया कल्पनाचे वडील मदनसिंग धनायत यांनी दिली.