छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील एका व्यावसायिकाची पत्नी डिसेंबर २०२२ मध्ये पळून गेली होती. पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाल्यानंतर ती त्याच्यासोबत सौदी अरेबिया व लिबियाला निघून गेली. ३ ऑगस्टला ती देशात परतली. त्या दरम्यान तिचा काही आतंकवादी संघटनांसोबत संपर्क आला असून देशविघातक कृत्यामध्ये तिचा सहभाग असल्याचा ई-मेल १८ ऑगस्ट रेाजी शहर पोलिसांना प्राप्त झाला. गुप्तचर यंत्रणा सतर्क बनली. याप्रकरणी एटीएस तपास करत असून महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मूळ मालेगावची असलेली ३४ वर्षीय साहिना (नाव बदलले आहे) हिचे सिडको परिसरातील एका व्यावसायिकासोबत २०११ मध्ये लग्न झाले. तिच्या पतीचा पेट्रोल पंपदेखील आहे. २०२२ मध्ये ती वडिलांसोबत सौदीमध्ये गेली होती. त्या दरम्यान तिची एका पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाली. देशात परत आल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात राहिली. सोशल मीडियावरून ओळख वाढल्यानंतर व त्याच्यासोबत डिसेंबर २०२२ मध्ये तिने देश सोडला. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.
ई मेल मध्ये गंभीर संशय, तपास सुरूडिसेंबरमध्ये गेल्यानंतर जानेवारी महिन्यात पतीला तिने पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न केल्याचा कॉल प्राप्त झाला. सूत्रांच्या मते पतीला काही छायाचित्रेदेखील मिळाली. सदर तरुण करिअरमध्ये मदत करणार असल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर ती थेट ३ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावर परतली. तेथून ती आईवडिलांकडे गेली. या दरम्यान ती सौदी अरेबियासह लिबियामध्ये काही महिने वास्तव्यास होती. मात्र, १८ ऑगस्ट रोजी शहर पोलिसांना तिच्याबाबत ई-मेल प्राप्त झाला व गुप्तचर यंत्रणा कामाला लागली. ई-मेलमध्ये साहिनाचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय ई-मेल पाठवणाऱ्याने व्यक्त केला. एटीएसकडे तत्काळ हा तपास सुपूर्द करण्यात आला. गुप्तचर यंत्रणांनीदेखील समांतर चौकशी सुरू केली.