औरंगाबाद: जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताचे संविधान अनेक वैशिट्यपूर्ण गुणांनी परिपूर्ण आहे. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत वादविवादातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देण्यात आला आहे. संविधान निर्मात्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व आणि प्रशासन हे नक्कीच आदर्श होते हे दिसून येते. संविधानाच्या इंग्रजी हस्तलिखितामध्ये भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास समोर ठेवून एकूण २२ चित्र रेखाटली आहेत. यातील १४१ क्रमांकाच्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे.
‘शिवराय आणि संविधान’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा. श्रीकिशन मोरे म्हणतात की,संविधान सभेत दि. ३१ डिसेंबर १९४८ रोजी भावी संविधानात मंत्रिमंडळात नियुक्त होण्यासाठी मंत्र्यांना काही शैक्षणिक अर्हता असावी काय? अशी चर्चा सुरु होती. त्याअनुषंगाने प्रा. के.टी.शहा यांनी मंत्र्यांना सुरुवातीला दहा वर्षे इंग्रजी व नंतरचे दहा वर्षे हिंदी भाषा अवगत असावी अशी दुरुस्ती सुचवली होती. महावीर त्यागी यांनी या सूचनेला नापसंती व विरोध दर्शवला. त्यांनी आपली भूमिका छत्रपती शिवाजी महाराज, रणजीत सिंग व अकबर यांचे शिक्षण आणि त्यांच्या आदर्श प्रशासकीय व्यवस्थेचा दाखला देऊन मंत्री बनण्यासाठी औपचारिक शिक्षण नाही तर पुढाकार, प्रामाणिकपणा, व्यक्तिमत्व, एकात्मता आणि बुद्धिमत्ता हे गुण आवश्यक आहेत असे सभागृहास स्पष्ट करून सांगितले होते. शेवटी हा तिढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात योग्य ती तरतूद करून सोडवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी शेवटचे भाषण झाले. यात त्यांनी भावी संविधान आणि स्वतंत्र भारतासमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना यावर विस्तृत विचार मांडले होते. या देशाच्या स्वातंत्र्याचे भविष्यात काय होईल? ते टिकेल कि जाईल? याची चिंता व्यक्त करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत झालेला त्यांच्याच स्वजनांचा अप्रामाणिक आणि दगाबाजीचा व्यवहार संविधान सभेत गंभीरपणे व्यक्त करून देशाला भविष्यातील त्या संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती. या प्रसंगावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान निर्मिती करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घटनांचा किती मोठा पगडा होता हे स्पष्ट होते.
१५ व्या प्रकरणापूर्वी शिवाजी महाराजांचे चित्रमहान चित्रकार नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी संविधानाच्या प्रत्येक पानावर चौकटीचे नक्षीकाम केले. तसेच चित्रकार बोस यांनी मुळ हस्तलिखीत प्रतीच्या प्रत्येक भागाची सुरुवात करताना २२ समर्पक चित्र रेखाटली आहेत. यातील पान क्रमांक १४१ वर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. यानंतर संविधानाच्या १५ व्या प्रकरणाची सुरुवात होते. यात अनुच्छेद ३२४ नुसार निवडणूक आयोग, लोकप्रतिनिधींची निवड याबाबत उल्लेख आहे. आयोगाने निवडणुका घेणे आणि योग्य लोकप्रतिनिधींची निवड करण्याची प्रक्रियाचा अंतर्भाव यात होतो. हे लक्षात घेता महान चित्रकार नंदलाल बोस यांनी या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि गुरु गोविंदसिंग यांचे चित्र रेखाटले आहे. चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात शस्त्र असून ते किल्ल्याच्या समोर उभे आहेत. यावरून त्यांची प्रशासनावरील पकड दिसून येते. तसेच जातपात न पाहता केवळ गुणांच्या आधारे योग्य व्यक्ती हेरून शिवाजी महाराजांनी अनेक मावळे घडवले. याच मावळ्यांच्या मदतीने त्यांनी उत्तम प्रशासन राबवले. अनुच्छेद ३२४ मध्ये देखील जनतेच्या प्रतिनिधी निवडीची चर्चा आहे. यातून अभ्यासकांनी आणि संविधान राबविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असेच अधोरेखित होते.
शिवाजी महाराजांची लोकशाहीप्रती दूरदृष्टीछत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यात विविध जाती धर्मातील लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व पाहून पदे देण्यात आली. छत्रपती शिवरायांनी त्या पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड केली. त्याला सुसंगत अशा राज्यघटनेतील १५ व्या भागात निवडणुका यावर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. शिवाजी महाराज यांची लोकशाहीप्रती असलेली दूरदृष्टी संविधानातून प्रतिबिंबित होते. आज त्यांच्या धर्म निरपेक्ष विचारांची नितांत आठवण होते.- प्रा. श्रीकिशन मोरे, उपप्राचार्य, मा. प. विधी महाविद्यालय