छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाईसह शहराच्या आसपास असलेल्या नवीन वसाहतींमध्ये पथदिवे नाहीत. नागरिक सातत्याने पथदिव्यांची मागणी करीत आहेत. त्यामुळे १६ हजार पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच बीओटी तत्त्वावरील निविदा प्रसिद्ध होईल, अशी माहिती मनपा प्रशासकांनी दिली.
मनपा प्रशासनाने ७ वर्षांपूर्वी ६० हजार पथदिव्यांचे काम दिल्ली येथील इलेक्ट्रॉन कंपनीला बीओटी तत्त्वावर दिले. हा प्रयोग यशस्वी झाला. एलईडी दिव्यांमुळे वीज बिलात मोठी बचत होऊ लागली. याच पद्धतीने आता नवीन १६ हजार दिवे लावले जातील. सातारा-देवळाई भागात किमान १० हजार पथदिवे लागतील. त्यानंतर उर्वरित शहरात दिवे लावण्याची योजना आहे. ११ हजार नवीन फिटिंग, ५ हजार नवीन पोल लावण्याचा मनोदय प्रशासकांनी व्यक्त केला.