छत्रपती संभाजीनगर : एलपीजी गॅस हा प्रत्येकाच्या घरात चूल पेटविण्यासाठी वापरला जातो. मात्र, त्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज लागते. एलपीजीतील ब्यूटेन आणि प्रोपेन वायूचे २ टक्के मिश्रण हवेत आल्यानंतर त्यास ऑक्सिजनची जोड मिळताच एका चिंगारीमुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर होते. सिडकोतील दुर्घटनेत एलपीजीचे हवेतील प्रमाण ६० टक्क्यापर्यंत पोहोचले होते. त्यास ऑक्सिजनची साथ मिळाली होती, मात्र, चिंगारी नसल्यामुळे त्याचे ज्वालामुखीत रूपांतर झाले नाही. तसे काही घडले असते, तर किमान पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता, असा अंदाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे संशोधक डॉ. भास्कर साठे यांनी दिली.
एलपीजी गॅसमध्ये ६० टक्के ब्यूटेन आणि ४० टक्के प्रोपेन वायूचे मिश्रण असते. थंड व उच्च दाबाखाली एलपीजी हा द्रवरूपात असतो. त्यास थोडीही उष्णता मिळाल्यास त्याचे वायूमध्ये रूपांतर होते. ब्यूटेन व प्रोपेनच्या मिश्रणात इथाईल मरकॅप्टन हा वायू थोड्या प्रमाणात मिसळल्यानंतर त्याचा उग्र वास येतो. ऑक्सिजन मिळाल्यानंतर हा वायू आगीच्या संपर्कात आल्यास त्याचे रूपांतर ज्वालामुखीत होते. सर्वसाधारण वातावरणात १.८ टक्के ब्यूटेन आणि दोन्ही वायूचे कमीत कमी २ टक्के मिश्रण ब्लास्टसाठी पुरेसे ठरते. सिडकोतील दुर्घटनेत तब्बल ६० टक्क्यापर्यंत एलपीजीचे हवेतील प्रमाण पोहोचले होते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ हवेच्या संपर्कात आला असता तर न भूतो, न भविष्यती, अशी हानी झाली असती, असेही डॉ. साठे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
११ टनच्या दुर्घटनेत ६०० ठार झाले होतेअमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये १९ नोव्हेंबर १९८४ साली एलपीजी गॅसची एक दुर्घटना घडली होती. त्यात गॅस ट्रान्सफर करताना पाईप लिक होऊन गॅस गळती झाली होती. त्यात ६०० लोकांचा मृत्यू, तर ६ हजार जखमी झाले होते. तसेच घटनास्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. सिडकोतील दुर्घटनेत टँकरमध्ये तब्बल १८ टन गॅस होता. त्यावरून घटनेची तीव्रता लक्षात येते, असेही डॉ. साठे म्हणाले.
...म्हणून करीत होते पाण्याचा माराटँकरची दुर्घटना झाल्यानंतर त्यावर सहा अग्निशमनाच्या बंबांद्वारे पाण्याचा मारा केला जात होता. त्यात ‘सीओटू’ वायूसुद्धा सोडण्यात येत होता. एलपीजी थंड वातावरण असल्यास त्याचे प्रसरण होत नाही. उष्णता वाढल्यानंतर द्रवरूपातून वायूमध्ये वेगात रूपांतर होते. त्यातच त्याचा ऑक्सिजनशी संपर्क आल्यामुळे अधिक ज्वलनशील बनतो. त्यामुळे ‘सीओटू’चा मारा करून ऑक्सिजन मिळू नये, यासाठीही पाण्याचा वापर केल्याचेही डॉ. साठे यांनी स्पष्ट केले.