औरंगाबाद : नांदेड येथील सराफ बाजारामधील गुरूकृपा ज्वेलर्सचे मालक रवींद्र चक्करवार यांच्या खून खटल्यातील एकमेव आरोपी भीम ऊर्फ छोटा भीम कोतवाल याला खंडपीठाचे न्या. एम. जी. सेवलीकर ( Aurangabad High Court) यांनी सशर्त जामीन मंजूर केला. नांदेडच्या सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपी भीम याने न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाऊ नये, या अटीवर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
काय आहे खटला ?२५ ऑक्टोबर २०१९ च्या रात्री रवींद्र चक्करवार यांचा कोणीतरी खून केला, अशी तक्रार रवींद्र यांच्या पत्नी ज्योती यांनी दिली होती. फिर्यादीत म्हटले होते की, त्यांच्या पतीचे ११ लाख रुपये नांदेडच्या एका बड्या व्यक्तीकडे बाकी होते. पैसे देण्यास ते टाळाटाळ करत होते. रवींद्र यांनी त्या व्यक्तीला पाठविलेला पैसे मागितल्याचा संदेश ‘व्हायरल’ झाला होता. त्यामुळे रवींद्र तणावात होते. रात्री पती घरी न आल्याने ज्योती यांनी मुलगा जयेशला दुकानावर पाठविले असता रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले होते.
भीमला अटकपोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे कपडे व इतर पुराव्यांच्या आधारावर २९ ऑक्टोबर २०१९ रोजी आरोपी भीम ऊर्फ छोटा भीम याला अटक केली होती. २२ जानेवारी २०२० ला पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. ३ मार्च २०२१ रोजी नांदेड सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयानेही आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता. काही अतिरिक्त नवीन मुद्दे व जवळपास दोन वर्ष जेलमध्ये झाल्याच्या आधारावर आरोपीने ॲड. गजानन कदम यांच्यामार्फत जामिनासाठी पुन्हा खंडपीठात धाव घेतली.